कर्जत | तालुक्यातील ३१ ग्रामपंचायती यांच्या मुदती संपल्या आहेत.सदस्य मंडळाची मुदत संपल्याने त्या सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सार्वत्रिक निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. फेब्रुवारीपासून तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सदस्य मंडळाची मुदत संपण्यास सुरुवात झाली असून या महिन्यात काही ग्रामपंचायती यांच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे आणि त्यामुळे अशा तब्बल ३१ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीपैकी २०२४ मध्ये पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत २० ग्रामपंचायती यांच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. त्यानंतर १० डिसेंबर २०२४ पर्यंत तालुक्यातील आणखी ११ ग्रामपंचायती यांच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे सध्या कर्जत तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात नाही.
सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत संपलेल्या २५ ग्रामपंचायतीमध्ये शासनाने प्रशासक यांच्या हाती कारभार दिला आहे. कशेळे, मोग्रज, माणगाव तर्फे वरेडी, सावेळे, वारे, किरवली, बोरिवली, शेलू, पाषाणे, मानिवली, हालिवली, आसल, खांडपे, शिरसे, ममदापुर, पळसदरी, सावळा हेदवली, पिंपळोली, बीड बुद्रुक, अंजप, रजपे, जामरुंग, चिंचवली अशा २५ ग्रामपंचायतींमध्ये तसेच मुदती आधी बरखास्त झालेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक आहेत.
तर त्याशिवाय वदप, वरई तर्फे नीड, तिवरे, वाकस, उमरोली असा सहा ग्रामपंचायतींमध्येदेखील सदस्य मंडळ अस्तित्वात नाही.मागील काही महिने लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीसाठी पुढे ढकलल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या वर्षे अखेरीस होण्याची शक्यता मावळली आहे. आता तालुक्यातील मुदत संपलेल्या ३१ ग्रामपंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुका नवीन वर्षात २०२५ मध्येच होण्याची शक्यता आहे.
विधानसबाह निवडणुकीच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय धुराळा उडणार आहे. स्थानिक पातळीवर निवडणुका आगामी काळात होणार असल्याने ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे तसेच पराभूत उमेदवार सुधाकर घारे यांच्या राजकीय चुरस निर्माण होणार हे जवळपास नक्की आहे.