शालेय सहलींमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गजबजली , किल्ले रायगड, समुद्रकिनार्‍यांचे आकर्षण

By Raigad Times    14-Dec-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | बालपण म्हणजे शाळा, शाळेतील सवंगडी, त्यांच्यासोबतची मुक्त भटकंती आणि शालेय सहली. दिवाळीनंतर थंडीचे दिवस सुरू झाले की, शालेय सहलींचा हंगाम सुरु होतो. सध्या चांगले रस्ते व कमी दरात एसटी उपलब्ध होत असल्याने लांब पल्ल्याच्या सहलींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सर्वच पर्यटनस्थळांवर शालेय विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. या सहलींमुळे पर्यटनस्थळावरील आर्थिक उलाढाल वाढण्याबरोबर एसटीच्या उत्पन्नातही भर पडते आहे.
 
गुलाबी थंडीमुळे सध्या सर्वत्र आल्हाददायक वातावरण आहे. माथेरानचा पारा ११ अंश सेल्सीयसच्या आसपास रेंगाळतो आहे. समुद्रकिनारे, गडकिल्ल्यांना सर्वांत अधिक पसंती आहे. माथेरान, किल्ले रायगड यासह अलिबाग, दिवेआगर या पर्यटन स्थळांवर गर्दी होताना दिसते आहे. शिवाय अष्टविनायकांपैकी पाली येथील श्री बल्लाळेेशर, महडचा गणपती इथेदेखील दर्शनासाठी शाळेच्या सहली येत असल्याचे दिसून येते. दिवाळीनंतर शालेय सहलींचा हंगाम सुरू झाला आहे.
 
हा शैक्षणिक उपक्रमांचा भाग मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाबरोबरच त्यांचे भौगोलिक ज्ञान वाढावे, राज्याच्या विविध भागांची त्यांना माहिती व्हावी हा उददेशदेखील शैक्षणिक उपक्रमांमागे असतो. ऐतिहासिक महत्व असलेल्या किल्ले रायगडावर येणारया सहलींचे प्रमाण अधिक आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याच्या दृष्टीने रायगड योग्य ठिकाण असल्याने शाळाही रायगडला अधिक पसंती देतात.
 
किल्ल्यावर तेथील मार्गदर्शक (गाईड) जी माहिती देतात ते ऐकून चिमुरडी अवाक होतात. किल्ला फिरण्यात संपूर्ण दिवस जातो. किल्ल्यावर ये जा करण्यासाठी रोप वेची व्यवस्था असली तरी तेथे मोठी गर्दी असते त्यामुळे अनेक शाळा आगावू आरक्षण करून रोप वे ने प्रवास करतात. मात्र अनेकांना आरक्षण नसल्याने ताटकळत बसावे लागते.
आर्थिक उलाढालीत वाढ
ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे, कारखाने अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात. त्याचबरोबर आता वॉटर पार्क, थीम पार्क, अ‍ॅम्युझमेंट पार्क अशा ठिकाणीही सहली जात आहेत. सहलीचे हे ट्रेंड पर्यटनवाढीसाठी उपयुक्त ठरत आहेत. या पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स, दुकाने, छोटे व्यावसायिक आदिंची आर्थिक उलाढालही वाढली आहे.

समुद्र किनार्‍यांचे आकर्षण
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासारख्या दूरवरून येणार्‍या विद्यार्थ्यांना समुद्राचे अधिक आकर्षण असते. त्यांनी मोठमोठी धरणे पाहिलेली असतात. परंतु अथांग पसरलेला समुद्र पाहून त्यांचे डोळे विस्फारतात. अशावेळी समुद्र स्नानाचा किंवा वॉटर स्पोर्ट्सचा मोह आवरता येत नाही. अशावेळी एखादा अपघात होण्याची भीती असते. परंतु महत्वाच्या किनार्‍यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आलेले आहेत.
बसचे आरक्षण आवश्यक
आता बहुतांशी शाळांनी सहलीसाठी एसटी बसला पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यासाठी किमान १५ दिवस आधी आरक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहलींचा ओघ वाढल्याने आपल्याला हव्या असलेल्या दिवशी बस उपलब्ध होणे अनेकदा कठीण होवून बसते.