अलिबाग | सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम) कार्यप्रणाली मध्ये रायगड जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिध्द केली आहे. २०२२, २०२३ प्रमाणे २०२४ मध्येही सातत्य कायम ठेवत रायगड पोलीस दलाने वार्षिक गुणांकनामध्ये राज्यातून तिसरे स्थान प्राप्त केले आहे. दरवर्षी सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा जास्तीत जास्त वापर गुन्हे प्रकटीकरण व गुन्हे प्रतिबंध करणेसाठी सर्व घटकांकडुन मासिक कामगिरीचा आढावा घेण्यात येतो.
त्यानुसार घटकांच्या कामगिरीचे मुल्यांकन करून उल्लेखनिय कामगिरी करणा-या घटकांचा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावामध्ये गौरव करण्यात येतो. रायगड जिल्हयाने गतवर्षाप्रमाणे सीसीटीएनएस कार्यप्रणालीच्या नावाप्रमाणे साजेसे कर्तव्य पार पाडत नोव्हेंबरपर्यंत २ वेळा प्रथम ३ व्दितीय व ६ वेळा तृतीय क्रमांक प्राप्त करीत सीसीटीएनएस प्रणालीच्या वार्षिक गुणांकनात तिसर्या क्रमांकाच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे.
गुरुवारी १२ डिसेंबर रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ रामटेकडी-पुणे येथे १८ व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या दिमाखदार समारोप सोहळ्यादरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व सीसीटीएनएस रायगड टीम यांना आकर्षक तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही रायगडला २०१८ मध्ये दुसर्या क्रमांकाचे, २०२३ मध्ये तृतीय क्रमांकाचे वार्षिक गुणांकनाचे पारितोषीक प्राप्त झाले आहे.
रायगड जिल्ह्याने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सीसीटीएनएसमधील फॉर्मची तत्काळ नोंदणी, सिटीझन पोर्टलवरील प्राप्त तक्रारींची तत्काळ निर्गती, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामकाज करीत सदरचे यश प्राप्त केले आहे. पोलीस ठाणेस अटक होणार्या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सदर प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरू राहील, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी केले आहे. तथा सदरचे यश हे रायगड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या अपार मेहनतीचे आहे. सदरचे सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता सतत प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.