माणगाव । माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरात दक्षिण रायगड जिल्ह्यासाठी आर.टी.ओ. कार्यालयासाठी संजय साबळे यांनी गेली 20 वर्षे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. यासाठी आ. भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनी सुमारे 16 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. मात्र अद्यापही दक्षिण रायगड जिल्ह्यातील वाहनचालक आर.टी. ओ. कार्यालयाच्या प्रतीक्षेत आहेत.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी माणगावातील मुंबई गोवा महामार्गा जवळील माणगाव शहरापासून केवळ 3 किमी अंतरावर असणार्या मुगवली फाट्यानजीक असणार्या जावळी येथील गट क्रमांक 73 मध्ये सुमारे 15 एकर गुरुचरण जमीन महाराष्ट्र शासनाने आरक्षित केली आहे.
ही जमीन आरक्षित करण्यासाठी शहरातील माणगाव तालुका रिक्षा व मिनीडोर चालक आणि मालक संघटनेचे अध्यक्ष संजय साबळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले आणि आमदार आदिती तटकरे यांना वेळोवेळी निवेदने देऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते. हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यास दक्षिण रायगड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील वाहनचालक आणि मालक यांना लाभ मिळणार असल्याने पेण येथे जाण्यासाठी वणवण आणि पायपीट संपणार आहे.
दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, मुरुड, पाली सुधागड अशा 9 तालुक्यांना तसेच पेण आणि अलिबाग अशा 2 तालुक्यांतील काही अंशी भागातील वाहन चालकांना लाभ मिळणार आहे. उर्वरित तालुके पनवेल येथे मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जोडले आहेत. रिक्षाचालक हलाखीची असते. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाईलाजाने रिक्षा चालवून पोट भरीत असतो. त्यामुळे त्यांना पेण येथे जाताना खिसे रिकामे करून जावे लागते.
त्यामुळे जावळी येथील शासकीय वसतीगृहात तातडीने तात्पुरती दालने आणि कक्ष उपलब्ध करून देण्यात आली तर हे कार्यालय सुरू होऊ शकते असे संजय अण्णा साबळे यांनी सांगितले. सध्या हे परिवहन कार्यालय पेण येथे असल्याने वाहनांची तपासणी आणि वाहनासंबधी कामांसाठी लांब अंतराचा पल्ला गाठण्यासाठी मजल दर मजल करत खड्ड्यातून तारेवरची कसरत करुन जावे लागते. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने पेण येथे जाताना वाहनांचे नुकसान झाल्यास परत फिरावे लागते.
पेण पासून पोलादपूर, श्रीवर्धन 125, महाड, म्हसळा 100, माणगाव, मुरुड, तळा 75, रोहा, सुधागड 50 किलोमीटर इतके मोठे अंतर आहे. मध्यवर्ती अशा माणगाव येथे आर.टि.ओ. कार्यालय झाल्यास हेच निम्मे होऊन पैसे आणि वेळ यांची बचत होईल असे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांनी सांगितले. याबाबत पेण येथील उपप्रादेशिक सहायक परिवहन अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले की, माणगाव येथे आरटिओ कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालया प्रमाणे आधुनिक आणि अद्ययावत कार्यालय होणार आहे. यापूर्वीच वाहन पासिंग ट्रेकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. माणगाव येथे कॅम्प घेताना अडचणी येतात. सर्वांचीच गैरसोय होते. नवीन कार्यालय होण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करु, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.