मोटारसायकल-एसटी अपघातात तरुणाचा मृत्यू ; मुरुडमधील घटना, एसटीचालकावर गुन्हा

By Raigad Times    16-Dec-2024
Total Views |
 Murud
 
मुरुड । मुरुड हद्दीतील निसर्ग हॉटेलजवळच्या रस्त्यावर शनिवारी (दि.14) सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुड एसटी बस डेपोतून रेवदंडामार्गे महाड बस सकाळी 8 वाजता निघाली होती.
 
दरम्यान निसर्ग हॉटेलच्या समोरील वळणावर आले असता दुचाकीची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
अरमान सलीम दखनी (18) असे घटनेतील मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो मुरुड नादगांव मोहल्ला येथील रहिवासी होता. या घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी एसटीचालक अविनाश दिघे यांच्याविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.