उरण । राज्य शासनाने रायगड जिल्हा मुबंईला जोडण्यासाठी रेवस रेड्डी सागरी महामार्ग तयार करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली शासकीय पातळीवर सुरू केल्या आहेत. या सागरी महामार्गाला स्थानिक जनतेचा विरोध नाही; परंतु हा नियोजित सागरी महामार्ग बनविताना उरणकरांचे नव्हे तर ऐतिहासिक वारसा लाभलेला द्रोणागिरी पर्वत व भाविकांचे श्रद्धास्थान द्रोणागिरी मंदिराचे अस्तित्व कायम ठेवून करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
अन्यथा द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिराच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरुन लढण्याच्या तयारीत उरणकर असल्याचे समजते.कोकणचे भाग्यविधाते समजले जाणारे दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरीस्टर ए. आर. अंतुले हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी 1980 मध्ये सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यावेळची फाईल आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे सापडली असता त्यामध्ये द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिराला धक्का न लावता सागरी महामार्ग होणार होता.
बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला असता तर नक्कीच हा मार्ग तेव्हाच पूर्ण झाला असता. तसेच मंत्रालयही उरणमधील द्रोणागिरी नोड परिसरात सुरू होऊन रायगडचा विकास झाला असता. परंतु हे मुख्यमंत्री पदावरून अचानक जाण्याने अधुरे राहिले आहेत. त्याला पुन्हा आता शासनाने चालना दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमीपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवस (रायगड) ते रेड्डी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते.
या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची एकूण लांबी 498 किमी इतकी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग असणार आहे. मात्र सदर महामार्ग हा उरण तालुक्यातील मौजे चाणजे या परिसरातून जात असताना ही याठिकाणावरील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांना विश्वासात न घेता भू संपादन, जागेचा सर्व्हे करण्यास शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याची माहिती स्थानिक शेतकरी, करंजा ग्रामस्थ मंडळ, जमीनधारक, सामाजिक कार्यकर्ते, कोंढरी ग्रामस्थ मंडळाला देण्यात आली नसल्याने संबंधितांनी आम्हाला विश्वासात घेऊन सदर प्रकल्प मार्गी लाण्याची मागणी शासनाकडे केली होती.
त्यावेळी सदरचा महामार्ग हा ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वत व जागृत देवस्थान द्रोणागिरी मंदिराला धक्का लागून याचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती दिसू लागल्याने स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. यावरून तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले व आताचे शासनकर्ते यांच्यात जमीन अस्मानाचा फरक दिसत आहे. त्यावेळी द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिराला हानी न पोहचता उभारला जाणार होता.
तर आत्ताचे शासनकर्ते भूमाफियांसाठी पुरातन वास्तू द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिराचे अस्तित्व नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. अरबी सुमद्राच्या करंजा खाडीकिनारी डोंगरमाथ्यांवरील श्री द्रोणागिरीमातेचे मंदिर अनेक वर्षांपासून प्रसिद्धीपासून दूर राहिले आहे. रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे.
अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. मात्र उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिर यांना यांना धक्का देत भूमाफियांनी शासकीय अधिकार्यांना हाताशी धरून द्रोणागिरी पर्वताचीच माती महामार्गासाठी वापरून ऐतिहासिक वारसा नष्ट करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पर्यावरणप्रेमी, पत्रकार, ग्रामस्थ यांच्यात असंतोष निर्माण याची खबर उरणमधील सार्वजनिक सामाजिक संघटना, झाला आहे. त्याविरोधात लवकरच आक्रमक भूमिका घेऊन द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिराला धक्का लावून नेण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू असा इशारा संबंधित संघटनांनी दिला आहे. याबाबत शासन काय निर्णय घेते? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.