सुकेळी खिंडीत ट्रेलर दुजाभकावर धडकला , ट्रेलरचालकाचा जागीच मृत्यू; खैरवाडीजवळील घटना

By Raigad Times    17-Dec-2024
Total Views |
 mangoan
 
नागोठणे | अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेतील चौपदरीकरणाच्या कामामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका संपण्याचे काही नावच घेत नाही. नागोठणेजवळील सुकेळी खिंडीच्या उतारावरील खैरवाडी गावाच्या थांब्यासमोर ट्रेलर रस्ता दुभाजकावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी (१६ डिसेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.
 
कोलाडकडून वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर सुकेळी खिंडीच्या उतारावर आला असता, चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ जाऊन रस्ता दुभाजकावर धडकला. त्यामुळे ट्रेलरवर असलेला कंटेनर १० ते १५ फुट अंतरावर पलटी होऊन ट्रेलरदेखील रस्त्यावर पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रेलरच्या चालक केबिनचा चेंदामेंदा होऊन, चालक पवन शिवाजी जाधव (वय ३३) हा केबिनमध्येच अडकून पडला.
 
त्यात गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात घडला त्यावेळेस सुदैवाने महामार्गावरुन दुसरे कोणतेही वाहन तेथून जात नव्हते, नाहीतर मोठा अपघात घडून मोठी जीवितहानी झाली असती.दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस वाकण केंद्राचे कर्मचारी, ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य मनोहर सुटे, किशोर नावले यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
 
हायड्राच्या सहाय्याने ट्रेलरचालकाला केबीनमधून बाहेर काढून त्यास जवळच असलेल्या जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.