भरत गोगावलेच पालकमंत्री व्हावेत ! रायगडातील भाजप-सेना आमदारांची इच्छा

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची माहिती

By Raigad Times    18-Dec-2024
Total Views |
nagpur
 
नागपूर | रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनाच मिळाले पाहिजे, अशी भूमिका कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि आ. महेंद्र दळवी यांनी मांडली आहे. गोगावले यांच्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या सहाच्या सहाही आमदारांनी तशी भूमिका वरिष्ठांकडे मांडली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी ‘रायगड टाइम्स’कडे संवाद साधला. यावेळी थोरवे यांनी मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांसह रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भूमिका स्पष्ट केली. आ.थारेवे म्हणाले, २०१९ साली रायगडात आ.महेंद्र दळवी, आ.भरत गोगावले आणि मी असे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला पालकमंत्री केले.
 
त्यामुळे पुढील काळात झालेल्या राजकीय घडामोडीत आम्ही तीनही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे भरत गोगावलेच झाले तरच आमच्या उठावाला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल, असे आ. महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे.
 
भरतशेठ यांच्या नावाला जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी सहमती दर्शवली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कर्जत मतदारसंघातील प्रलंबित कामांचा उहापोह करताना, येत्या काळात कर्जत मतदारसंघातील काही महत्वाच्या प्रश्नांना हात घालणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी नदी जोड प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले आहेत.
पेण अर्बन प्रश्न कायमस्वरुपी सोडविणार
पेण अर्बन बँकेचा प्रश्न महत्त्वाचा असून, १५ वर्षांपासून त्यासाठी खातेदार, ठेवीदारांचा संघर्ष सुरु आहे. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून गेल्या पाच वर्षांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. मात्र तांत्रिक अडचणी येत होत्या. ईडीने स्थगिती उठवली आहे.
 
त्यामुळे जप्त मालमत्तांचा लिलाव करुन शासनाने खातेदार, ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन, हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
नदी जोड प्रकल्प राबविणार
कर्जत तालुक्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी नदी जोड प्रकल्प राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा नदी ही उन्हाळ्यात कोरडी पडते. परिणामी, पाणी योजना बंद पडतात. याचा फटका या भागातील आदिवासी, शेतकर्‍यांना बसतो.
 
त्यामुळे पेज नदीचे पाणी हे जिल्हा नदीला ‘नदी जोड प्रकल्पा’तून आणण्याचा ऐतिहासिक प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावून हा प्रकल्प आम्ही करणार आहोत. पेज नदीचे पाणी जिल्हा नदीमध्ये वर्ग केल्यास त्या पट्ट्यातील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येईल. त्याचा लाभ या भागातील आदिवासी, शेतकरीबांधवांचा होऊन, विकास साधला जाईल.
शेतकर्‍यांना न्याय देणार
रिलायन्स कंपनीकडून शेतकर्‍यांवर अन्याय झालेला आहे.कंपनीने शेतकर्‍यांच्या जमिनी कायमस्वरुपी नादुरुस्त केल्या आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधून शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
 
कर्जत तालुका नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तसेच विद्युत बेल्ट म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. त्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढील काळात काम करणार असल्याचे आ. महेंद्र थोरवे म्हणाले.
भरतशेठ हेच पालकमंत्री पाहिजेत!
२०१९ साली रायगडात आ. महेंद्र दळवी, आ.भरत गोगावले आणि मी असे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः ला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून, राष्ट्रवादीच्या एकमेव आमदारांना पालकमंत्री केले.
 
त्यामुळे पुढील काळात झालेल्या बंडखोरीत आम्ही तिनही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे भरत गोगावलेच झाले पाहिजेत, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. तरंच आमच्या उठावाला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल, असे आ. महेंद्र थोरवे म्हणाले.