कर्जत कल्याण राज्यमार्गालगत बांधकाम सुरुच बांधकाम विभाग, नेरळ प्राधिकरणाच्या नोटिशीला केराची टोपली

By Raigad Times    18-Dec-2024
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जत कल्याण या राज्यमार्गालगत नेरळ ग्रामपंचायत हद्दीत दुकानांचे गाळे बांधण्याचे काम मागील चार महिन्यांपासून सुरु आहे. सप्टेंबर महिन्यात ते बांधकाम बंद करण्यात यावे, यासाठी नेरळ विकास प्राधिकरण संकुल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी नोटीसा बजावल्या होत्या. तरीदेखील मागील दोन अडीच महिन्यांत त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण करून घेतले असून कोणत्याही प्रकारच्या नोटीसींना न घाबरता बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
 
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण यांना न घाबरणारा व्यक्ती नक्की कोण आहे? याची चर्चा नेरळमध्ये सुरु आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पेट्रोल पंप भागात कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर सर्व्हे नंबर ८६/१ मध्ये बांधकाम करण्यात आले आहे. मात्र त्या जमिनीचे मालक शाहजाद युसूफ कपाडिया यांच्या माध्यमातून रस्त्यालगत बांधकाम करण्यात आले आहे.
 
त्या ठिकाणी येथून जाणारा रस्ता हा राज्यमार्ग असून असल्याने रस्त्याच्या मध्यापासून ठराविक मीटर अंतर सोडून बांधकाम करता येते. मात्र सदर ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याने लावलेला माईल स्टोन याच्यापुढे बांधकाम केले आहे. त्यात मागील अनेक महिने त्या ठिकाणी असलेला माईल स्टोन हा देखील संबंधित बांधकाम करणार्‍यांनी हलवून अन्य ठिकाणी उभा केला आहे.
 
दुसरीकडे त्या बांधकामाच्या खाली मागील डोंगरातून येणारे पाणी यांचा नैसर्गिक नाला होता, मटार तो नाला देखील बांधकाम करताना जमिनीमध्ये गाडण्यात आला आहे. त्यामुळे त्या नैसर्गिक नाल्यातून वाहणारे पाणी हे रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतीची नियोजनाची जबाबदारी असलेल्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांच्याकडून सदर बांधकाम करणारे कपाडिया यांना ६ सप्टेंबर रोजी नोटीस बजावली होती.
 
त्या नोटिसीमध्ये नोटीस मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये आणि बांधकाम सद्यस्थितीत बंद करावे असे नमूद केले होते. त्याचवेळी नेरळ ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी सदर बांधकामास दिलेली नाही, असे नेरळ ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
 
त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील रस्त्याच्या मध्यापासून ठराविक अंतर सोडून हे बांधकाम करण्यात आलेले नाही आणि त्यामुळे रस्त्याच्या हद्दीत असलेले बांधकाम तात्काळ हटविण्यात यावे, असे सूचित करण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नेरळ प्राधिकरण यांच्या नोटिसा येऊनही सदरचे बांधकाम बिनधास्तपणे सुरु असून नेरळ गावामध्ये त्या बांधकामाला नक्की कोणाचा आशीर्वाद आहे? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
आम्ही संबंधित बांधकाम करणार्‍यांना नोटीस बजावली आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्याची अंतर निश्चित केल्यावर बांधकाम तोडण्याबाबत निर्णय होऊ शकतो. आमच्या खात्याने त्या ठिकाणी बांधकाम करण्यास कोणतीही परवानगी दिलेली नाही. - निलेश खिल्लारे, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग