अलिबाग। ‘ओयो’च्या नावाखाली हॉटेल शानमध्ये सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायाचा रायगड स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. याप्रकरणी चेंढरे येथील दाम्पत्याला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरु आहे. मंगळवारी, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत अलिबाग शहरानजीक चेंढरे येथे ‘ओयो’ लॉजिंगच्या नावाखाली शान हॉटेलमध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली.
याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना माहिती देऊन, कारवाईसाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, वानवडे आणि पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदारांची पथके तयार केली. दोन महिला पंच पाचारण करुन, बनावट ग्राहकाला लॉजवर पाठविण्यात आले.
तेथे खात्री झाल्यानंतर, या बनावट ग्राहकाने बाहेर येऊन पोलिसांना सांकेतिक इशारा करताच पोलीस पथकाने लॉजवर धाड टाकली आणि देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड केला. याप्रकरणी शान हॉटेलचा मालक शैलेश प्रभाकर तांडेल (वय 57) आणि त्याची पत्नी (दोघेही रा. चेंढरे ता.अलिबाग) यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143, 3(5) सह अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 3, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.