कोकणातील पोटखराबा जमिनीवरील बागांनाही फळपीक विमा द्या!

खा.धैर्यशील पाटील यांची कृषीमंत्री शिवराज चौहान यांच्याकडे मागणी

By Raigad Times    19-Dec-2024
Total Views |
delhi
 
नवी दिल्ली | रायगडसह कोकणात पोटखराबा जमिनीवर केल्या जाणार्‍या फळाबागांनाही फळपिक विमा संरक्षण देण्यात यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांच्याकडे केली आहे. तसेच योजनेच्या नुतनीकरणाची तारीख वाढविण्यात यावी, असेही म्हटले आहे. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणामध्ये शेतजमिनीचे क्षेत्र फार कमी आहे.
 
त्यामुळे येथील शेतकरी जादातर कृषीक्षेत्रात भातशेती आणि डोंगराळ, पोटखराबा भागात फळझाडांची लागवड करत असतात. मात्र पोटखराबाच्या जमिनीवर केलेल्या फळबागेला विम्याचे संरक्षण दिले जात नाही, पर्यायाने कोकणातील शेतकरी या योजनेपासून उपेक्षीत राहतो. याबाबतची कैफियत बागायतदारांनी अनेदा खा.धैर्यशील पाटील यांच्यासमोर मांडली होती. याची दखल घेऊन खा.पाटील यांनी याबाबतचे निवेदन देशाचे कृषीमंत्री शिवराज चौहान यांना दिले आहे.
 
या निवेदनात त्यांनी कोकणातील शेतकरी, बागायतदारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. खा. धैर्यशील पाटील यांनी नमूद केले की, कोकणातील हापूस आंबा आणि काजूच्या बागा शेतकर्‍यांच्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहेत, परंतु हे बागायती बहुतांश वेळा गैर-कृषि योग्य जमिनीत असतात. सध्या फळ पीक योजना फक्त कृषि योग्य जमिनीवरच लागू असल्यामुळे या फळबागांना विम्याचा लाभ मिळत नाही. तो मिळातर शेतकर्‍यांना याचा लाभ मिळले.
 
फळपिक विम्यासाठी मुदतवाढ मिळावी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी या योजनेच्या नवीनीकरणाची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर होती, परंतु अनेक शेतकरी विविध कारणांमुळे नवीनीकरण करू शकले नाहीत. त्यामुळे या योजनेची तारीख वाढवून शेतकर्‍यांना आणखी एक संधी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, खा. धैर्यशिल पाटील यांनी कोकणातील शेतकरी-बागायतदारांचा एक महत्वाचा प्रश्न हाती घेतला आहे. याची सोडवणूक केंद्र सरकारने केल्यास याचा मोठा फायदा कोकणातील शेतकर्‍यांना होणार आहे.