अलिबाग | गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जाणार्या ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीला नौदलाची स्पीड बोट धडकून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० प्रवाशांसह तीन नौदलाच्या कर्मचार्यांचा समावेश आहे. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
११ नौदलाच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुमारे १०१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेट ऑफ इंडियाजवळ बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी ३.५० वाजता ही दुर्घटना घडली. नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होती. त्या चाचणीच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड झाला.
त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नौदलाची स्पीड बोट ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीला धडकून झालेल्या भीषण दुर्घटनेत १० प्रवासी आणि तीन नौदल कर्मचारी अशा १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन व्यक्ती गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
११ नौदलाच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुमारे १०१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत ही माहिती मिळाली आहे. अधिक माहिती गुरुवारी सकाळी मिळेल. कोणी मिसिंग असेल तर सकाळपर्यंत कळेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मृत्यू झालेल्यांना पाच लाख
दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नौदलाकडून देण्यात आली माहिती
दरम्यान, या घटनेबाबत नौदलाने रात्री माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १८ डिसेंबर रोजी सुमारे दुपारी चार वाजता नौदलाच्या बोटीची इंजिन चाचणी करण्यात येत होती. त्यावेळी नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि नीलकमल या प्रवासी बोटीला ती बोट धडकली.
तटरक्षक दल आणि पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचावकार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका यांनी बचावकार्य केल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले.