कर्जत । कर्जत तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानच्या तालुका व्यवस्थापक ललिता तेलवणे यांची मे 2024 ला बदली झाली आहे. तेव्हापासून या अभियानाचा कारभार प्रभारी तालुका व्यवस्थापकांच्या हातात आहे. आता निवडणुका संपल्या असून सात महिन्यानंतर तरी कर्जत तालुका व्यवस्थापकांची नियुक्ती शासनाने करावी, अशी मागणी केली जात आहे. महिला बचत गटांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जाते.
यात गावपातळीवर बचत गटांची चळवळ चालविणार्या महिला स्वयंसिद्ध बचत गट चालवत असतात. त्या बचत गटांना अर्थसहाय्य पुरविणे तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे ही कामे या अभियान मार्फत होत असते. या अभियानच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम तालुका पंचायत समिती, व्यवस्थापिका तर जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा व्यवस्थापिका अशी साखळी निर्माण करून बचत गटांची चळवळ यशस्वी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. त्यात कर्जत तालुका हा महिला बचत गटांना सक्षम करणारा तालुका समजला जातो.
मात्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानकडून गाव पातळीवर बचत गट चळवळ राबविणार्या 46 समूह संशोधन व्यक्तींपैकी बहुसंख्य व्यक्तींकडून तालुका व्यवस्थापिका ललिता तेलवणे यांच्या कार्यपद्धतीबद्दल थेट राज्य सरकारकडे तक्रारी करण्यात आल्याने मे महिन्यात त्यांची बदली करण्यात आली.
तेव्हापासून ग्रामीण जीवनज्योती अभियान कर्जत तालुका व्यवस्थापक म्हणून त्याच कार्यालयातील राजू नेमाडे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. त्याला आता सात महिने उलटले आहेत. मात्र तालुका व्यवस्थापकपदाचा कारभार हा प्रभारी अधिकार्याच्या हाती आहे. मधल्या काळात निवडणुका होत्या. आता त्या संपल्या असून नवीन तालुका व्यवस्थापक शासन नेमणार आहे की नाही? असा सवाल बचत गट चळवळीत सहभागी महिला विचारात आहेत.
प्रियदर्शनी मोरे यांच्या फेर्या वाढल्याने चर्चा
रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियानाच्या जिल्हा समन्वयक आणि जिल्हा व्यवस्थापिका प्रियदर्शनी मोरे यांचे तत्कालीन कर्जत तालुका व्यवस्थापिका ललिता तेलवणे यांना आशीर्वाद असल्याचे बोलले जात होते.
त्यांची बदली झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापिका प्रियदर्शनी मोरे यांच्या कर्जत तालुका फेर्या वाढल्या आहेत. महिन्यात चार फेर्या मोरे यांच्या होत असून कर्जत तालुक्याचा कारभार जिल्हा व्यवस्थापिकेच्या माध्यमातून राबविला जात आहे काय? अशी चर्चा सुरु आहे.
प्रभारी तालुका व्यवस्थापक कार्यालयात गुंतले
मे 2024 मध्ये कर्जत तालुका व्यवस्थापक बनलेले राजू नेमाडे हे कार्यालयाबाहेर पडत नाहीत. कर्जत तालुक्यात भेटी देऊन महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना करणे, अडचणी दूर करणे आदी कामे करण्यासाठी तालुका व्यवस्थापकांची नियुक्ती केली जाते, मात्र राजू नेमाडे हे कार्यलयाबाहेर पडत नाहीत आणि तालुक्यात भेटी देत नाहीत, अशा तक्रारी महिलांमधून केल्या जात आहेत.