जिल्ह्यात २८ भातखरेदी केंद्रांना मंजुरी , ५ डिसेंबरपासून सुरु होणार खरेदी

By Raigad Times    02-Dec-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अखेर शासनाने रायगड जिल्ह्यात हमीभावाने भातखरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत २८ खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगामात शेतकर्‍यांना भाताची विक्री करता येणार आहे. एक महिन्यापासून जिल्ह्यातील शेतकरी भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत होते. ५ डिसेंबरपासून जिल्ह्यात भात खरेदी सुरू होणार आहेत.
 
भाताची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकर्‍यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली आहे. यानुसार शेतकर्‍यांना नियोजन करावे लागत आहे. याकरिता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकर्‍यांनी सोबत आपल्या आधारकार्ड तसेच बँकेच्या पासबुक आणणे आवश्यक आहे. तसेच रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकर्‍यांवार टाकण्यात आली आहे.
 
भात खरेदीच्या वेळी शेतकर्‍यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा सातबारा उतार्‍याची व गाव नमुना ८(अ) ची छायाकिंत प्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता आणणे आवश्यक आहे. या उतार्‍यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान खरेदी करता येणार आहे. भाताला २ हजार ३०० रुपये दर सर्वसाधारण भाताला २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर झाला आहे. तर अ दर्जाच्या भाताला २ हजार ३२० रूपये प्रति क्विंटल दर जाहीर झाला आहे.
 
रायगड जिल्ह्यात भाताची विक्री होते, त्यामुळे २८ खरेदी केंद्रावर भात खरेदीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भात खरेदीसाठी नियमावली भात खरेदी करताना ते स्वच्छ कोरडे असावे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने निर्धारीत केलेल्या धानाच्या आधारभूत किंमती, दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यात आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ शेतकर्‍यांकडून उत्पादीत झालेले नवे धान खरेदी करण्यात येईल.
 
ऑनलाईन जमा होणार पैसे खरेदी केलेल्या धान देय रक्कम शेतकर्‍यांना अदा करताना ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्याबाबत शासनाचे निर्दे श आहेत. ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान भरडधान्य विक्री केलेल्या दिवसापासून पुढील २ दिवसांपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, अशा शासनाच्या सूचना आहेत.
केंद्र शासनाने विहित केलेल्या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास भात खरेदी केले जाणार नाही. कोणत्याही परीस्थितीत जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान विक्रीसाठी आणू नये. केवळ शेतकर्‍यांकडून उत्पादित झालेले नवे भात खरेदी केले जाईल. त्याच बरोबर ज्या शेतकर्‍यांकडे भरडधान्य असेल ते स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य असल्याची खातरजमा केल्यावरच भाताची खरेदी करण्यात येईल. - के. टी . ताटे, जिल्हा पणन अधिकारी