मुरुड जंजिरा । दिवाळी हंगाम चांगला गेल्यानंतर आता मुरुडमध्ये हिवाळी पर्यटनही चांगले फुलले आहे. मुरुडची गुलाबी थंडी पर्यटकांना चांगलीच भावली असून, ताजे मासे खाण्यासाठी येणारे पर्यटक थंडीचा आनंद घेत आहे. शिवरायांचे जलदुर्ग पाहण्याबरोबरच समुद्राच्या लाटांचा मनसोक्त आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबी यासारख्या ताज्या मासळीबरोबरच वर्षभर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सोडे खरेदी करण्याकरिता पर्यटकांची झुंबड उडताना दिसते आहे.मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत. कोणताही वईस वास न येणारे सोडे फक्त मुरुडला मिळतात. मुरुडचे अर्थकारण या हिवाळी हंगामावर अवलंबून राहते.
याचे कारण अनेक वर्षे रखडलेला साळाव मुरुड रस्ता झाला असून, मुरुडच्या किनार्याचे सुशोभिकरण झाल्याने उत्तम पार्किंगची सोय झाली आहे. हंगामात 400 पर्यटकांची वाहने समुद्रकिनारी पार्कींग झाल्याने पर्यटक पर्यटनाचा खरा आनंद घेऊ शकत आहेत. सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई, हलवा, बोंबील, अंबाडी सुकट, पांढरी सुकट कोळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सुकवली.
पर्यटकांची चांगली साथ मिळाल्याने साठवलेला माल संपत आहे. कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीचे उत्पादन बनविण्यावर बंधन आहे, कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे की मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी काँक्रीटचे ग्राउंड पाहिजे. जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते, व मासळीचा दर्जा उत्तम होतो. मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालदेखील होत असते.
कोकणातून परदेश आणि परराज्यातही मासे पाठवले जातात. शिवाय त्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी वर्षाला हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते. परंतु मुरुडकडे त्यादृष्टीने पहिले जात नाही. मच्छिमारांसाठी रायगडला कोणताही चांगला प्रकल्प आला नाही. येथील मच्छिमारांचे मासेमारीत कौशल्य बघता यथील मासळीला मुरुडलाच मार्केट मिळाले तर कोळी बांधवांचा डिझेल खर्च वाचेल व मासे परदेशात नेणार्या कंपन्यांमुळे येथील युवकांना रोजगार मिळेल, अशी आशा मच्छिमारांना आहे. यावर्षी मुरुडचा चेहरा मोहरा बदला आहे.
अनेक विकासाची कामे झाल्याने पर्यटक काशीदप्रमणाने मुरुडलाला आले. हॉटेल व्यवसायिक खुश आहेत. पण पद्मदुर्ग किल्ल्याचा विकास कधी होणार? पर्यटनासाठी जेटी कधी बनणार? मुरुड कोळी वाड्यातून या किल्ल्यासाठी बोटी सुटल्या तर कोळी तरुणांना काम मिळेल, असे मच्छिमार प्रकाश सरपाटील यांनी सांगितले.