मुंबई | गेटवे ऑफ इंडियाजवळ नौदलाची बोट प्रवासी बोटीला धडकून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता प्रशासनाने गुरुवारी गेटवे ऑफ इंडियावरून बोटीतून प्रवास करणार्या सर्व लोकांना लाईफ जॅकेट अनिवार्य केले आहे. यावेळी काही पर्यटकांनी लाईफ जॅकेट कसे वापरायचे याची महिती नसल्याने त्याची मदत होईल का? असा प्रश्न उपस्थित केला व अधिकार्यांनी लोकांना आपत्कालीन परिस्थितीत लाईफ जॅकेट कसे वापरावे याबद्दल सूचना द्याव्यात, अशी मागणी केली.
दरम्यान, बुधवारी या दुर्घटनेतून वाचलेल्या काहींनी दावा केला की फेरीमध्ये पुरेशी लाईफ जॅकेट नव्हती. बुधवारी झालेल्या दुर्घटनेत नौदलाचा एक कर्मचारी आणि दोन कंत्राटी नौदल कर्मचार्यांसह तेरा जणांचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेनंतर १०० जण बचावण्यात आले आहे. ही फेरी गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा बेटावर १०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती.
गेटवे ऑफ इंडिया येथे नियुक्त सहायक बोट निरीक्षक देविदास जाधव यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी अलिबाग, एलिफंटा लेणी किंवा एलिफंटा लेणीजवळील मांडवा येथे फेरीबोट घेऊन जाणार्या प्रत्येक प्रवाशाला लाइफ जॅकेट वापरणे बंधनकारक केले आहे. प्रवाशांनी लाइफ जॅकेट वापरणे आवश्यक आहे कारण ते आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवू शकतात, असे प्रवासी संगीता दळवी यांनी सांगितले. बुधवारच्या अपघातानंतर लोकांनी घाबरण्याची गरज नसल्याचेही त्या म्हणाल्या.