नेरळ रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार , स्थानकाला रंगरंगोटी; विकासकामांचे उद्घाटन करणार

By Raigad Times    20-Dec-2024
Total Views |
 KARJT
 
कर्जत । मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील नेरळ रेल्वे स्थानकात येणार्‍या पर्यटक प्रवाशांमुळे नेरळ जंक्शन रेल्वेस्थानकाला महत्व आहे. या स्थानकाचे महत्व लक्षात घेऊन नव्याने रंगरंगोटी करण्याचे काम मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे या स्थानकाचे रुपडे बदलणार आहे.नेरळ स्थानकातील पादचारी पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने रेल्वेचे अधिकारी नेरळ येथे येणार आहेत.
 
त्यासाठी नेरळ स्थानकाला नवीन रुपडे आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाच्या या कामाबद्दल प्रवासी मात्र खुश असून रेल्वेचे अधिकारी हे दरवर्षी कर्जत नेरळ भागात यायला हवेत अशी सूचनादेखील प्रवासी करीत आहेत. नेरळ रेल्वे स्थानकातील काही विकास कामांचे उदघाटन करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक हे नेरळ येथे येणार आहेत. त्यासाठी नेरळ स्थानकाला नवीन रूप देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे.
 
नेरळ स्थानकातील सर्व वास्तू यांना रंगरंगोटी केली जात असून रात्रीदेखील ही कामे वेगाने सुरु आहेत. स्थानकातील पादचारी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी महाव्यवस्थापक हे नेरळ येथे येणार असून त्यावेळी स्थानकातील निवारा शेडचे लोकार्पणदेखील होणार आहे. दुसरीकडे त्या निमित्ताने नेरळ स्थानकातील मेन लाईन वरील दोन्ही फलाटांची दुरुस्ती आणि नंतर रंगरंगोटी केली जात आहे. तर सर्व भागात सुरु असलेली कामे करताना स्थानकातील फलाटदेखील नव्याने रंगवण्यात येत आहे.
 
छपरापासून पायापर्यंत सर्व ठिकाणी रंगांची कामे सुरु असल्याने नेरळ स्थानकाच्या नवे रूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे. तर जुनी तुटलेल्या भिंती पाडून नवीन भिंती बांधणे लोखंडी दरवाजे, सुरक्षा दरवाजे यांना दुरुस्त करून त्या त्या ठिकाणी रंगकामदेखील रेल्वेकडून सुरु आहे.
 
दरम्यान, नेरळ स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरु असलेली दुरुस्तीची कामे लक्षात घेता नेरळ स्थानक नव्याने सजत आहे. त्याचा परिणाम नेरळ स्थानकातील प्रवासी वर्ग खुश असल्याचे दिसून येत आहे. तर मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक यांच्यासाठी एवढी रंगरंगोटी केली जात असेल तर दरवर्षी महाव्यवस्थापक यांच्या भेटी प्रत्येक स्थानकात व्हायला हव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.