महाड एमआयडीसीमध्ये अ‍ॅस्टेक कंपनीत स्फोट; ९ कामगार जखमी

मॉकड्रील असल्याचे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

By Raigad Times    21-Dec-2024
Total Views |
mhad
 
महाड | महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसीत असलेल्या अ‍ॅस्टेक लाईफ सायन्सेस लिमि. या कंपनीत गुरुवारी, १९ डिसेंबरला दुपारी स्फोट होऊन झालेली दुर्घटना दडपण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाकडून केला गेला. कंपनीत झालेला स्फोट मॉकड्रील होते असे भासवण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून करण्यात आला. मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कंपनीचा हा प्रयत्न हाणून पडला आहे.
 
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रांमधील एस्टेक लाइफ सायन्स कंपनीत गुरूवारी दुपारी ३ वाजण्याचे सुमारास अचानक एका रसायन असलेल्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊन टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की त्याचा आवाज परिसरातील तीन किलोमीटरपर्यंत पसरला. या स्फोटाच्या तीव्रतेने उडालेलेप्लांटचे पत्रे व लोखंडी तुकडे या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना लागून ते जखमी झाले.
 
जखमी झालेल्या कामगारांमध्ये रितेश रामदासनिंबरे (वय १९, तळे महाड), वसंत दगडू जंगम (वय ४३ टाकीकोंड, बिरवाडी, महाड), आर्यन राजीव रॉय (वय-२० चांभारखिंड, महाड), दिनेश गणपत म्हसळकर (वय -२१ गोरेगाव, प्रशांत गोविंद चाचले (वय २२ धारवली, पोलादपूर), प्रथमेश दत्ताराम मुसळकर गोरेगाव) यांसह रामचंद्र, गुलाबचंद आणि तेजस निंबरे अशा नऊ जणांचा समावेश आहे.
 
सदर घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता, या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे प्रदान करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
 
पोलिसांकडून कारखान्यातील ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीर निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला नसून वेसलमध्ये स्फोट होऊन त्या स्फोटामुळे पत्र्याचे तुकडे व लोखंडी मटेरियल लागून कामगार किरकोळ प्रमाणात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासली नाही. हे सर्व कामगार कामावर हजर झाले आहेत असे सांगण्यात आले.