महाड | माणगाव ते पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात पाचजण ठार झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले त्यांच्यावर माणगावच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले.
त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुण्याच्या ससून रूग्णालयात हलवण्यात आले आहे. पुण्याहून ही बस लग्नाचे वराड घेवून महाडच्या बिरवाडी येथे नि घाली होती. ताम्हिणी घाटातील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला कलंडली.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील जाधव कुटुंबीय वर्हाड घेऊन खाजगी बसने महाड बिरवाडीकडे लग्नासाठी निघाले होते. माणगाव तालुक्यातील विळा ताम्हिणी घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण अपघातात बस खाली चिरडल्याने, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
तर ३४ जण जखमी झाले. मृतांमध्ये संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव यांच्यासह एका पुरुषाचा समावेश असून, त्याची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु झाले.
वरमायचा मृत्यू; लग्नमंडपावर शोककळा
माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात लग्नाच्या वर्हाडाला झालेल्या आपघातात पाच जणांचा मृत्यू झाला यात नवर्याची आईदेखील मृत्युमुखी पडली. संगिता जाधव असे त्यांचे नाव आहे. महाडच्या बिरवाडी परीसरातील कातीवडे गावात हा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर अपघाताची माहिती देण्यात आली. अपघाताची बातमी कळताच संपूर्ण लग्नमंडपात शोककळा पसरली.