कोकणातील पोलिसांचे राहणार आता सोशल मिडीयावर लक्ष

प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडियावर नियंत्रण कक्षाची उभाणार; विशेष पोलीस महानिरिक्षक संजय दराडे

By Raigad Times    21-Dec-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | कोकणातील पाचही जिल्ह्यात सोशल मिडीयावर लक्ष्य ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिली. रायगडमधून या उपक्रमाची सुरूवात होणार आहे. अलिबाग येथे पोलीस पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ही बाब लक्षात घेऊन पोलीस दलाकडून कोकणातील पालघर, ठाणे ग्रामिण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात समाज माध्यम नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे.
 
तसे निर्देश पाचही जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. पुढील एक महिन्यात हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित होईल, अशी माहिती दराडे यांनी दिली.
 
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी पोलीस ठाण्यांच्या निर्मिती करून, त्या ठिकाणी प्रशिक्षीत कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. किनारपट्टीवर बेकायदेशीर कारवायांना आळा बसावा यासाठी वेगवान गस्ती नौका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवर काम करणार्‍या विवीध सुरक्षा यंत्रणामध्ये समन्वय असावा यासाठी नौदल, तटरक्षक दल, पोलीस, कस्टम्स यांच्या नियमित बैठकांचे आयोजन केले जात आहे.