नागोठणे । पहाटेची गुलाबी थंडी अन् दाट धुके असे मनमोहक दृश्य सध्या रायगड जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शहरासह गावे पहाटेच्या प्रहरी दाट धुक्याची चादर पसरल्याने हरवून जात आहेत. त्याचप्रमाणे वातावरणातसुध्दा गारव्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पंरतु या पहाटेच्या पडलेल्या दाट धुक्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.
जिल्ह्यातील मुख्य मार्गावरून प्रवास करत असताना वाहनचालकांना समोरील काहीच दिसत नसल्यामुळे अतिशय धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे. तसेच दाट धुक्याची चादर पसरल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. दाट धुक्यामुळे पहाटे वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ताही दिसत नाही. रस्त्याचा अंदाज घेत दिवे सुरू ठेऊन मुंबई गोवा महामार्गासह जिल्ह्यातील मुख्य मार्गावरून वाहनांची वाहतूक संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पहाटेच्या प्रहरी पाचदहा फुटांवरील घरे, इमारती, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती.
धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण रायगडकरांना सध्या अनुभवायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र सध्या समाधानकारक पसरणारे दाट धुके व वाल शेतीसाठी पूरक वातावरण यामुळे जिल्ह्यातील वालाची शेतीला यावर्षी चांगला बहर येईल असे जाणकार मंडळींकडून सांगण्यात येत आहे. धुक्याची चादर ओढून घेतलेले रस्ते आणि इमारती अशा ‘धुकेमय’ वातावरणाची अनुभूती सध्या रायगडकर घेत आहेत.
पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर जिल्ह्यातील शहरावर ओढल्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील शहराच्या विविध भागांत सकाळी धुके पडत असून पहाटे धुक्याचे सौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि कॅमेर्यात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार बाहेर पडू लागले आहेत. मॉर्निंग वॉक किंवा व्यायामासाठी घराबाहेर पडणारी मंडळीही धुक्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे पहायला मिळते.
दरम्यान वातावरणातील यासारख्या बदलामुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले असून ताप, सर्दी, खोकला आजारांनी बरेच नागरिक त्रस्त झाले आहेत. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणार्या नागरिकांसह, शाळकरी मुले आणि कामानिमित्त घराबाहेर पडणार्यांना धुक्यातून वाट काढावी लागत आहे.