नांदगावात रानगव्याचा ग्रामस्थावर हल्ला

By Raigad Times    23-Dec-2024
Total Views |
 Murud
 
मुरुड । तालुक्यातील नांदगावमध्ये रानगव्याचा शिरकाव झाला आहे. गावामध्ये एका ग्रामस्थावर हल्ला करून हा रानगवा पसार झाला. या हल्ल्यात ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रायगडातील सुप्रसिद्ध अभयारण्य म्हणजेच मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य आहे.
 
या अभयारण्यात काही वर्षांपूर्वी रानगवे सोडले होते. आता या रानगव्यांची संख्या वाढत असल्याने त्यांचा तालुक्यामध्ये संचारसुद्धा वाढला आहे. फणसाड अभयारण्य व नांदगाव लागून असल्याने हे रानगवे गावात शिरले होते. मुरुड तालुक्यातील नांदगावच्या समुद्रकिनारी पहाटे ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले. सदर गवा हा गावालगतच्या फणसाड अभयारण्यातून आला असून शुक्रवारी सकाळी तो नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील खालचा मोहल्ला परिसरातील गौतम दाबणे यांच्या नारळ सुपारी बागेतून रस्त्यावर आला.
 
दरम्यान एका व्यक्तीला त्याने धडक दिली आणि तो नांदगाव समुद्रकिनारी पळून गेला. त्यानंतर त्याने समुद्रकिनार्‍यासह नजीकच्या बागांतून हुंदडत परत फणसाड अभयारण्याकडे कूच केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान नांदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य जितेंद्र दिवेकर यांनी सदर गव्याची माहिती मुरुडच्या वनखात्याला दिली आहे.