कोलाड येथे लक्झरी बसने घेतला पेट; सुदैवाने गाडीतील प्रवासी सुखरुप

By Raigad Times    23-Dec-2024
Total Views |
 kolad
 
कोलाड | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड रेल्वे पुलाखाली लक्झरी बसने अचानक पेटघेतला. नागरिकांच्या अथक प्रयत्नाने तसेच अग्निशामक दलामुळे आग आटोक्यात आली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. शनिवारी, २१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस गाडी बोरिवलीहुन मालवणच्या दिशेने जात असतांना कोलाड रेल्वे पुलाखाली आली असता गाडीने अचानक पेट घेतला.
 
ही बाब बस चालकाच्या लक्षात येताच बसचालकाने बस थांबवली व क्लिनरने बसमधून उतरून पाहिले असता गाडीने पेट घेतल्याचे लक्षात आले. यामुळे बसमधील असणारे ३० प्रवाशी, दोन चालक, दोन कर्मचारी यांना खाली उतरण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चंद्रकांत लोखंडे, विनायक लोखंडे, दादा धुमाळ, वन विभागाचे अधिकारी, शिक्षक गर्जे, आशिष वाणी व असंख्य सतर्क नागरिक यांच्या मदतीने धाटाव औद्योगिक येथील अग्निशामक दल तसेच दिपक नायट्रेट फायर टीमला पाचरण करण्यात आले. यामुळे आग आटोक्यात आली. गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मोठा अनर्थ टळला.