भावी पालकमंत्री म्हणून बॅनरबाजी , तटकरे, गोगावले समर्थकांची...

By Raigad Times    24-Dec-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? याची चर्चा सुरु असतानाच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भावी पालकमंत्री म्हणून भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्या नावाने जोरदार बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.
 
अदिती तटकरे यांची महिला व बालकल्याण मंत्रीपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी रोह्यासह श्रीवर्धनमध्ये त्यांच्या शुभेच्छांचे फलक झळकावले आहेत. याच बॅनरवर अदिती यांचा भावी पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असे वारंवार सांगत आहेत.
 
मंत्रीपद कुठलेही दिले तरी चालेल पण रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळाले पाहिजे, असे म्हटले आहे. गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रायगडचे भावी पालकमंत्री असा उल्लेख असलेले फलक जागोजागी लावले आहेत. गोगावले यांच्यापाठोपाठ रोह्यात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख असलेले फलक झळकल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे गोगावले आणि तटकरे यांच्यात चुरस पहायला मिळत आहे.
 
१५ डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. रायगडच्या मंत्री अदिती तटकरे यांना महिला व बाल कल्याण खाते देण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
अदिती तटकरे यांच्यासह भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात दोन मंत्री पदे आली असली तरी पालकमंत्रीपद कोणाकडे जाते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. रायगडात तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळाले पाहिजे, अशी मागणी आमदारांची आहे. एकंदरीत रायगडात पालकमंत्री पदावरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे.