लाडक्या बहिणींच्या खात्यात लाभ जमा होण्यास सुरुवात , २१०० पुढच्या आर्थिक वर्षापासून मिळणार..?

By Raigad Times    25-Dec-2024
Total Views |
 mumbai
 
मुंबई | लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे पंधराशे रुपये पुन्हा जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने घोषित केलेले २१०० रुपये कधीपासून मिळणार? यावर नवनी वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल, असे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.लाडकी बहीण योजनेला प्रचंड असा प्रतिसाद महिलांनी दिला.
 
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करता आले नाहीत. मात्र नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यावर पंधराशे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १२ लाख ८७ हजार बहिणींच्या खात्यात या योजनेंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी मंगळवारी जमा करण्यात आला आहे.
 
येत्या दोन ते तीन दिवसांत उर्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. तसेच, आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले, त्यांनाही लाभ मिळणार आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्माननिधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिली होती. परंतु, सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना १५०० रुपये मिळत आहेत.
 
त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर अदिती तटकरे म्हणाल्या, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सरकारची योजना सांगितली होती. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल अशी माहिती त्यांनी सोशलमाध्यमावर दिली.
 
"नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत होती. तोपर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली आहे. अद्याप पुन्हा नोंदणी सुरू करण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्माननिधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.” "स्थानिक पातळीवर, तलाठी कार्यालय, योजना पोहोचवणार्‍या यंत्रणा, आशा सेविका, सेवा सुविधा केंद्रातलाभार्थ्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी केली जाईल. डीबीटी करताना जाणवलं की एकाच आधारकार्डवर नोंदणी झालेल्या आहेत, तेव्हा आम्ही कारवाई केली आहे”, असेही आदिती तटकरे म्हणाल्या.