महावितरणच्या कार्यालयासमोर लावणार रेड्यांच्या झोंब्या

पोलादपूर येथील महावितरणविरोधात सामाजिक कार्यकर्ते राज पार्टे यांचा इशारा

By Raigad Times    25-Dec-2024
Total Views |
poladpur
 
पोलादपूर | खराब झालेले मिटर, भरमसाट येणारे विज बिल, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, नागरीकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष, विद्युत मीटर खंडित करण्याचे वाढलेले प्रकार, नवीन लाईन जोडणी, नवीन विद्युत पोल टाकण्यासाठी घेत असलेली अवाढव्य रक्कम, महावितरण कर्मचार्‍यांकडून असहकार्य यामुळे संतापलेल्या पोलादपुरांनी महावितरणच्या कार्यालयासमोर रेड्यांच्या झुंजी लावण्याचा इशारा एका समाजसेवी संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांनी दिला.
 
आपली माती आपली माणसं संघटनेतर्फे पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या महावितरण संबंधी समस्यांसाठी महावितरण कार्यालयात अधिकार्‍यांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक समस्यांसह या चर्चासत्रात उपस्थित होते. नागरीकांनी यावेळी महावितरण अधिकार्‍यांना धारेवर धरत पोलादपूर तालुक्यातील खराब झालेले मीटर आपण कधी लावणार? मीटर खराब असताना देखील आकारण्यात आलेले वाढीव वीज बिल आपण कसे कमी करणार? मीटरची एवरेज रिडिंग आपण कोणत्या नियमानुसार घेतली? महावितरणच्या अधिकार्‍यांची अरेरावीची भाषा कधी थांबणार? यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले.
 
५० वर्षापूर्वीचे जुने विद्युत खांब याबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी आली. या चर्चे साठी आपली माती आपली माणसं संघटनेचे पदाधिकारी थेट मुंबईहून पोलादपूर येथे दाखल झाले होते. यावेळी महावितरणचे उपअभियंता चोरमाळे, महाडिक, पाटील, चव्हाण, कदम उपस्थित होते. पितळवाडीचे कनिष्ठ अभियंता पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. यासोबतच गंजलेले लोखंडी पोल, खराब झालेले सिमेंटचे पोल बदलण्यात यावे अशी मागणी आपली माती, आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी केली. नवीन विद्युत पोल बसविण्याचे पंचवीस हजार रुपये कसे मागतात? असा सवालही त्यांनी केला.
 
आपली माती, आपली माणसं संघटनेने महावितरण संबंधित विविध समस्या मांडण्यासाठी २३ डिसेंबर २०२४ रोजी महावितरण कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन सोशल मीडिया, बॅनर, मोबाईल द्वारे संपर्क साधून केले होते. मात्र यासाठी प्रत्यक्षात फारसे नागरीक आले नाहीत. रेड्याची झोंबी पाहण्यासाठी मध्यरात्रीपासून नागरीक उपस्थित राहतात. आणि सामाजिक कार्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
 
त्यामुळे एक महिन्यात महावितरणकडून समस्या सोडविल्या गेल्या नाहीत तर महावितरण कार्यालयासमोर १ लाख ५१ हजार रुपये प्रथम क्रमांक बक्षिसाच्या भव्य रेड्यांच्या झुंजी आयोजित करण्यात येणार आहेत. चर्चासत्रात पोलादपूर तालुक्यातील माजी सभापती संभाजी साळुंखे, लोहारे माजी सरपंच किसन पारकर, आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर, उपाध्यक्ष संजय उतेकर, संभाजी पार्टे, अर्जुन पार्टे, भगवान पार्टे, गणेश उतेकर, दर्पण दरेकर, ओंकार मोहिरे यांसह आपली माती आपली माणसं संघटनेच्या पदाधिकारी उपस्थिती लावली.