कॅबिनेटमंत्री भरत गोगावले पोहचले किल्ले रायगडावर , छत्रपती शिवरायांना केले अभिवादन

By Raigad Times    26-Dec-2024
Total Views |
 mhad
 
महाड | कॅबिनेटमंत्री भरत गोगावले यांनी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत श्री जगदीश्वराला अभिषेक घातला.
 
कॅबिनेटमंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह किल्ले रायगडावर जाऊन प्रथम त्यांनी शिरकाई देवीच दर्शन घेतले. तेथून पायी चालत त्यांनी श्री जगदिश्वर मंदिरात जावून अभिषेक करून, राज्यात पुढील पाच वर्षे महायुतीचे सरकार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीला अभिवादन केले.
 
रायगडावरील होळीचा माळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्याला पुष्पमाला घालून ते नतमस्तक झाले.यानंतर त्यांनी शिवराज्याभिषेक स्थळी मेघडंबरीत असणार्‍या छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पमाला घालून नतमस्तक झाले. सध्या शैक्षणिक सहलींचा मौसम असल्याने राज्यभरातून अनेक शैक्षणिक सहलीचे विद्यार्थी विद्यार्थिनी किल्ले रायगड पहावयास आले आहेत.
 
अनेक शिक्षक विद्यार्थ्यांनी यावेळी भरत गोगावले यांचे अभिनंदन करत आपल्या कॅमेर्‍यात त्यांच्यासोबतचे फोटोही संग्रहीत केले. दरम्यान, किल्ले रायगडची गेली अनेक वर्षे जयहिंद व्यायाम मंडळ व मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविणार्‍या संस्थेच्या सर्व सदस्यांचे गोगावले यांनी कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले. किल्ले रायगडावर पुरातत्व विभाग व रायगड प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी करत माहितीही घेतली.
 
यानंतर ना.भरत गोगावले यांनी रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे असणार्‍या माँसाहेब जिजाऊंच्या समाधीला भेट देत तेथे ते नतमस्तक झाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बंधू तरडे, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडीक, शिवसेना जिल्हा प्रवक्ते नितिन पावले, शहरप्रमुख डॉ. चेतन सुर्वे, माजी नगरसेवक दिपक सावंत, सुनिल आगरवाल, नितिन आर्ते, उपशहर प्रमुख निखिल शिंदे, राजू देशमुख, अ‍ॅड. सनी जाधव, रोहन धेंडवाल, प्रमोद शेडगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.