कनिष्ठ लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप , न्यायाधीशांच्या मारल्या खोट्या सह्या

पनवेल न्यायालयातील प्रकार, लिपीक अटकेत

By Raigad Times    26-Dec-2024
Total Views |
panvel
 
पनवेल | पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या खोट्या सह्या मारुन कनिष्ठ लिपिकानेच बनावट वारस दाखल्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयिताने ८० बोगस दाखले दिल्याचे म्हटले आहे. वारस दाखल्यातील या हेराफेरीमुळे खळबळ उडाली आहे.
 
याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या पहिल्या संशयित आरोपीचे नाव दीपक फड असे असून दीपक हा पनवेल येथील कनिष्ठ न्यायालयात कनिष्ठ लिपीक या पदावर काम करत होता. दीपकला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अ‍ॅड. महेश देशमुख यांनी पनवेल येथील दिवाणी न्यायालयामध्ये ठाणे येथील कमलादेवी नारायण गुप्ता विरुद्ध भरत नारायणदास गुप्ता, रवी नारायणदास गुप्ता, रतन नारायणदास गुप्ता, पुजा भावेश केसरी या अर्जाच्या चौकशीसाठी न्यायालयात अर्ज केला होता.
 
पनवेल येथील दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयात संबंधित अर्ज क्रमांकाची पडताळणी केल्यावर असा अर्जच आला नसल्याचे उघडकीस आले. गुप्ता कुटुंबियांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयाने कोणतेही याप्रकरणी आदेश दिले नसताना या आदेशावर सहाय्यक अधीक्षक प्रवीण बांदिवडेकर आणि न्यायाधीशांची सही बनावट असल्याचा संशय न्यायालयाच्या प्रशासकीय यंत्रणेला आला. त्यामुळे हा सर्व गैर कारभार उघडकीस आला.
 
पनवेल येथील दिवाणी न्यायालयाच्या अधिक्षक संचिता घरत यांनी ही बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविला. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुनील वाघ हे या प्रकरणाचा तपास करीत असून न्यायालयात कनिष्ठ लिपीक पदावर काम करणारा दीपक फड याला याप्रकरणी रविवारी सायंकाळी अटक केली. दीपक फड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने अशा प्रकारचे ८० बोगस दाखले दिल्याची कबुली दिली आहे.
 
दीपक हा मागील पाच वर्षांपासून कनिष्ठ न्यायालयातील संगणकीय विभागात कनिष्ठ लिपीक या पदावर काम करीत होता. नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ महिन्याच्या दरम्यान दीपकने वारस दाखल्याची सुनावणी प्रलंबित असताना न्यायाधीशांची खोटी स्वाक्षरी करुन दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर असे शिक्के मारून वारस दाखल्याची ऑर्डर तयार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. नेमक्या किती लाभार्थ्यांनी आणि किती कोटींची संपत्ती मिळविण्यासाठी या बोगस दाखल्यांचा वापर केला? याचा तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.