उरण | जेएनपीए बंदरातून मुंबईत येण्या- जाण्यासाठी जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना अलविदा करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी नवीन वर्षात बंदरातून प्रवाशांसाठी अद्ययावत दोन स्पीड बोटी धावणार आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत या सागरी मार्गावरून लाकडी बोटी १६ फेर्या करीत प्रवासी वाहतूक करीत होत्या. यासाठी जेएनपीए दरमहा १९ लाख ६८ हजार रुपये खर्च करीत आहेत.
मात्र सध्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठीनवीन वर्षांत बंदरातून प्रवाशांसाठी अद्ययावत दोन स्पीड बोटी धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना जेएनपीएतून मुंबई ३५ ते ४० मिनिटांत गाठता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणार्या सर्वांनाच होणार आहे.
जेएनपीएने या बोटींच्या ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० खर्चाच्या निधीलाही २० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दोन स्पीड बोटी पुरवठा करण्याची हमी दिली आहे. त्यानुसार उन्हाळी हंगामात २० ते २५ प्रवासी क्षमता व पावसाळी हंगामात १० ते १२ प्रवासी क्षमता असलेल्या हरित सागर आणि हरित नौका या दोन वेगवान बोटी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सेवेत दाखल होणार आहेत.