अलिबाग | नाताळ आणि वर्षाअखेरची चाहूल लागताच, रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. पर्यटकांची रेलचेल वाढल्याने पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस आले आहेत. अलिबाग, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन परिसर पर्यटकांनी बहरले आहेत.
त्यामुळे हॉटेल, कॉटेज, आणि रेस्टारंट व्यवसाय तेजीत आहे. दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एप्रिलपासून जून महिन्यापर्यंत पर्यटकांची मोठी रेलचेल रायगडात पहायला मिळते. सध्या याची प्रचिती रायगडमधील अलिबाग, श्रीवर्धन आणि मुरुडमधील पर्यटनस्थळांवर येत आहे. इथे आलेले पर्यटक किनार्यांवर फिरून झाल्यावर समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबत आहेत. एटीव्ही राईड बरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोटर्सचा मनमुराद आनंद घेत आहेत.
त्यात बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलींग यांचा समावेश आहे. उंट सवारी, घोडागाडी यामुळे बच्चेकंपनी खुश आहे. अगदी लहान मुले वाळूत वेगवेगळ्या प्रतिकृती बनविण्यात रमलेले पहायला मिळतात. नाताळच्या सुट्ट्यांमुळे अलिबागमधील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा येथे साधारणपणे २० हजार पर्यटक दाखल झाले होते. तर मुरुड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरुड आणि फणसाड येथे १२ हजारहून अधिक पर्यटक दाखल झाले होते.
पर्यटकांच्या आगमनामुळे समुद्रकिनारे फुलून गेले होते. स्थानिक व्यावसायिकांना यामुळे रोजगार संधी उपलब्ध झाल्या होत्या. बोटींग व्यवसायिक, स्टॉलधारक, नारळ पाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत असल्याचे पहायला मिळत होते. थर्टी फर्स्ट आता काही दिवसांवर असून, येथील व्यावसायिकांनाही त्याचे वेध लागले आहेत.
त्यांनीही पर्यटकांच्या आणि नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी देश-विदेशातील पर्यटकदेखील आवर्जून भेट देत असतात. पोलीसही आपली कामगिरी उत्तमप्रकारे पार पाडत आहेत.
बीच शो आणि बरेच काही...
किनार्यावर पर्यटकांसाठी स्पीड बोट, पँरेसेलिंग बोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
दर शनिवार, रविवारी अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन किनार्यावर सुरु असलेला ‘बीच शो’ पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. सरत्या २०२४ या वर्षाला निरोप देण्यासाठी व २०२५ या नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी रायगडचे समुद्रकिनारे फुलले असून थर्टी फर्स्टसाठी लॉज, हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे बुकींग फुल होऊ लागल्या आहेत.