अलिबाग | रोहा-अलिबाग रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी गुरुवारी (२६ डिसेंबर) अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
खासदार सुनील तटकरे म्हणाले की, केंद्रांची पंतप्रधान ग्रामसडक योजना व राज्याच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असलेली कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण करीत असताना केलेल्या कामांचा दर्जा, गुणवत्ता चांगली असली पाहिजे अशी सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उप मुख्य कार्यकारी जि.प.सत्यजित बडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग जगदीश सुखदेवे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, जिल्ह्यात असलेल्या दिव्यांग, अपंग व्यक्तींना त्यांची तपासणी करुन आवश्यक असलेले साहित्य, उपकरणे यांचा पुरवठा करण्यात यावा. तसेच वयोश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६५ वयोमर्यादेवरील ज्येष्ठ नागरीकांसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करुन त्यांची योग्य ती तपासणी करावी.
शहरी भागातील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय तर ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथेशिबिरांचे आयोजन करावे. वयोश्री योजनेंतर्गत शिबिरांचे कामकाज १५ ते २० जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या. तसेच केंद्र शासनाच्या असलेल्या वयोश्री योजनेमधून तपासणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य, उपकरणे देण्यात असावी.
तर राज्य शासनाच्या असलेल्या वयोश्री योजनेमधून तपासणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना ३ हजार रुपये देण्यात यावे. तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करताना तेथील लोकप्रतिनिधींनाही कळविण्यात यावे. शिबिरांमध्ये तपासणी केलेल्या नागरिकांची योग्य रितीने तपासणी करुन त्या प्रत्येकांची नोंद जतन करुन ठेवावी. जिल्ह्यातील बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांकरिता दिलेले उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे. ज्या बँकांचे पिक कर्ज वाटपाचेप्रमाण कमी आहे.
त्या बँकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा खासदार सुनिल तटकरे यांनी बँकांना दिला. बँकांनी संवेदनशील होऊन विविध केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास बँकांनी चालढकल केल्यास संबंधित बँक अधिकार्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच बँकांनी शेतकर्यांना दिलेल्या कर्जाची माहिती नावांसह सादर करावी, अशा सूचना संबंधित बँक अधिकार्यांना दिल्या.