ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी तुफान गर्दी , नीलकमल बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटक

By Raigad Times    27-Dec-2024
Total Views |
Murud
 
मुरुड जंजिरा | मुरुड हे पर्यटनाचे क्षेत्र असल्याने नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक मुरुडमध्ये दाखल झाले आहेत. राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होताना दिसत आहे.
 
विविध जिल्ह्यांतून याठिकाणी शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दरम्यान, गेट वे येथील नीलकमल बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ल्यात जाताना पर्यटक, प्रवाशांना सुरक्षा जॅकेट सक्तीचे करण्यात आले आहे.मुरुड समुद्रकिनाराही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. त्यामुळे शहरासह पंचक्रोशी भागातील लॉजिंग, हॉटेल, स्टॉल धारक, घरगुती खानावळ तेजीत असून बरेच महिन्यांनी व्यावसायिक सुखावले आहेत.
 
मुंबई, पुणे, सातारा, पनवेल, नाशिक, वाई सह राज्यातून पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र बोटीत लहान मुलांना नो एन्ट्री केल्याने पर्यटकांनी नाराजी दर्शवली. गेट वे ते एलिफंटा या जलप्रवासात पर्यटकांच्या बोटीला नेव्हीच्या बोटीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता.
 
त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार अ‍ॅशन मोडवर असून, प्रत्येक प्रवासी बोटीच्या संख्येपेक्षा जास्त प्रवासी घेऊन नये तसेच प्रत्येक पॅसेंजरला सेफ्टी जॅकेट घातल्याशिवाय प्रवास करु देऊ नये असा आदेश शासनाकडून काढल्याने राजपुरी येथील बंदर निरीक्षक सतिष देशमुख यांनी या आदेशाचा पालन करत राजपुरी जेट्टीवरुन प्रत्येक बोटीत संख्येनुसार ते पण प्रत्येक पर्यटकांना सेफ्टी जॅकेट घालून बोटीत प्रवेश दिला जात होता.
 
ज्या बोटीत लहान मुलांना सेफ्टी जॅकेट नसतील त्या बोटींना परवानगी नाकारल्याने तिकीट कार्यालयाजवळ गोंधळ उडाला आणि पर्यटकांनी नाराजी दर्शवली. काही पर्यटकांनी बंदर निरीक्षक यांना घेराव घालून लहान मुलांना सोडण्यास विनंती केली आमच्या जबाबदारी वर घेऊन जातो. परंतु बंदर निरीक्षक यांनी साफ नकार दिल्याने बंदर निरीक्षकांना पर्यटकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी मुरुड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही शालेय विद्यार्थ्यांना जेट्टीवरुनच किल्ल्याचे फोटो काढून उदास चेहर्‍याने परतावे लागले.
 
काही पर्यटकांनी मुरुड समुद्रकिनारी येऊन समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद तर कोणी उंटावरून, तर कोणी घोडा गाडीतून तर बाईक फिरवण्याचा आनंद घेतला. शिड्याचे बोटधारकांनी सांगितले की, बंदर निरीक्षक यांनी बुधवारी अचानक सांगितले की प्रत्येक बोटीत संख्येनुसार सेफ्टी जॅकेट पाहीजेत, तरच तुम्हाला पर्यटकांना किल्ल्यात नेण्यास परवानगी दिली जाईल. बोटीत प्रवास करताना प्रवाशांच्या संरक्षणासाठी सेफ्टी जॅकेट बोटीत असणेक्रमप्राप्त आहे. बोटधारकांनी यांची सवय करायला पाहिजे. बोटीत सेफ्टी जॅकेट असते तर ही वेळ आली नसती लहान मुले किल्ला न बघता परतवा लागले नसते.