खोपोली | राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (२६ डिसेंबर) पनवेल ते खोपोली असा प्रवास करीत प्रवाशांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही स्थानकांची पाहणी करुन एसटी आगारातील सुविधा आणि प्रवाशांचे प्रश्न जाणून घेतले. प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बस स्थानकांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यांनी पनवेल बस स्थानकाची पाहणी केली. येथील बस सेवा, कर्मचार्यांच्या सुविधा आणि व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
स्वच्छता गृह, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि महिला विश्रांती कक्षाच्या दर्जा उंचावण्यासाठी संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधून बस वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे येणार्या अडचणी जाणून घेतल्या आणि या समस्येवर त्वरित उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. प्रवाशांनी सांगितलेल्या समस्यांवर त्वरीत निवारण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
पनवेल बस आगार हे कोकणातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी अधिक चांगल्या व सोयीस्कर सेवा पुरविण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. पनवेल ते खोपोली असा बस प्रवास करत बसमधील प्रवाशांसोबत संवाद साधला. तद्नंतर परिवहन मंत्री यांनी खोपोली बसस्थानकाचा आढावा घेत परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडून अधिकची माहिती देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली. यावेळी परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते.