कर्जत | माथेरान शहरात सरत्या वर्षाला निरोप येणार्या पर्यटकांची संख्या हजारांमध्ये असते. ते लक्षात घेवून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी दस्तुरी नाका येथील प्रवेशद्वार सजवले आहे. दरम्यान, माथेरान शहरात थंडी अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक हजेरी लावतील, असा नगरपरिषदेला विश्वास आहे.
मुंबईपासून जवळ असलेल्या, थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. त्याचवेळी नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर हे पर्यटक माथेरानमधून आपल्या घरी जाण्यासाठी निघतात. हे लक्षात घेऊन माथेरानमध्ये हॉटेल व्यावसायिकांपासून अगदी लहान व्यावसायिक हा महत्वाच्या पर्यटन हंगामासाठी सज्ज झाला आहे.
येणार्या पर्यटकांचे स्वागत करण्यातही माथेरान नगरपरिषद आघाडीवर असून या पर्यटनस्थळाचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तूरी नाका येथे स्वागताचे मनोरे उभे केले आहेत.प्रवेशद्वार रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांनी सज्ज झाले असून याचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरगी फुगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे पुढील काही दिवस माथेरान शहर हे झोपलेले नसते. दिवसरात्र पर्यटकांची ये जा असते आणि त्यामुळे या काळात शहरातील कोणत्याही रस्त्यांवर कचरा साचून राहू नये, याची काळजी घेण्यासाठी आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांची वर्दळ शहरात दिसून येणार आहे.
पुढील पाच सहा दिवस कर्मचारी वर्ग शहरातील पर्यटकांच्या दिमतीला असेल असा विश्वास नगरपरिषदेकडून व्यक्त होत आहे. पर्यटकांची संख्या लक्षात घेवून पाणीपुरवठा योजना व्यवस्थित सुरू रहावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नियोजन केले जात आहे.प्रवासी वाहनाने माथेरान येथे येणार्या पर्यटकांची संख्या ८० टक्के असते आणि त्यामुळे नेरळ माथेरान घाट मार्गे प्रवासी वाहतूक करणार्या टॅक्सी संघटनांनी देखील २४ तास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस प्रशासनाकडून पार्किंग फुल्ल झाल्यावर घाटरस्ता वाहतूक कोंडीमध्ये अडकू नये यासाठी नेरळ पोलिसांचे सहकार्य घेण्याचे नियोजन केले आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून माथेरान पालिकेने दस्तूरी नाका येथील प्रवासी कर संकलन करणार्या एकाहून अधिक खिडक्या कार्यान्वित करण्याची आवश्यकता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
येणारा विकेंड आणि नंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पालिकेने दस्तूरी नाका येथे प्रवासी कर संकलन करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात अन्यथा पर्यटकांच्या रांगा या रस्त्याच्या कडेने लागून वाहतूक कोंडी होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे नगरपालिककेने त्याआधीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे माजी अध्यक्ष नरेंद्र कराळे यांनी केली आहे. टॅक्सी संघटना पर्यटकांची गैरसोय होणार नाही अशी सेवा देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.