अलिबाग | काशिद समुद्रात एक पर्यटक बुडाल्याची घटना शुक्रवारी, २७ डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. धर्मेश देशमुख (५७) असे बुडालेल्या पर्यटकाचे नाव आहे. पुणे येथून ते पर्यटनासाठी आले होते. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे मुख्यध्यापक आणि शिक्षक असे आठ ते दहा जण मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी पर्यटनास आले होते.
मुख्याध्यापक धर्मेश देशमुख हे समुद्रात स्नानासाठी आपल्या शिक्षकांसह उतरले होते. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना बाहेर काढले. धर्मेश यांना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यानंतर जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.