नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक...पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी रायगड पोलीस सज्ज

By Raigad Times    28-Dec-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेला आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी असलेली अलिबाग, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर ही ठिकाणे, खालापूर व कर्जत तालुक्यातील फार्महाऊसेस, थंड हवेचे ठिकाण माथेरान या ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गैरकृत्यांवर करडी नजर
जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांकडे विशेष पथक तयार करण्यात आले असून हॉटेल, धाबे, कॉटेज, फार्महाऊस येथे गैरकृत्य होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. दारु पिऊन धिंगाणा घालणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, मनोव्यापारावर परिणाम करणारे विविध मादक द्रव्यांचे जसे गांजा, ड्रग्स इत्यादीचे सेवन करणे, गैरवर्तन करणे यावर रोख लावण्याकरीता महत्वाच्या ठिकाणी पोलीस पथके व कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

alibag
 
महिला सुरक्षेकरिता विशेष पथक
महिला सुरक्षेसाठी साध्या गणवेशातील पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांचे पथक व बंदोबस्त अलिबाग, काशीद, नागाव, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, मांडवा येथील विविध समुद्रकिनार्‍यांवर तसेच शहर, मुख्य बाजारपेठ येथे नेमण्यात येणार आहे.
सायबर सुरक्षा
सायबर पोलिसांतर्फे नववर्षाच्या अनुषंगाने विविध समाजमाध्यमांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. समाजमाध्यमांवर कोणीही व्हिडीओ, फोटो, ऑडीओ क्लिपद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करुन दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतूक नियोजन
वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये याकरिता मुख्य रस्ते तथा वाहतूक कोंडी होणार्‍या ठिकाणी वाहतूक पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मद्यपान करुन वाहन चालविणार्‍यांवर चाप बसावा, याकरिता ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर केला जाणार असून मद्यपान करून वाहन चालविणार्‍या वाहनचालकांविरूध्द कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नाकाबंदी
नववर्ष स्वागताकरिता आलेल्या नागरिकांविरुध्द कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता जिल्ह्यातील २८ पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी खालीलप्रमाणे नाकाबंदी, फिक्स्? पॉईंट व पेट्रोलिंग बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
अंमलीपदार्थ विरोधी पथक
जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या अनुषंगानेदेखील रायगड जिल्ह्यात येणारी सर्व वाहने, फार्महाऊसेस, हॉटेल्स, लॉजेस, पाटर्यांची ठिकाणे, समुद्र किनारपट्?टीची ठिकाणे येथे पोलीस ठाण्याकडील साध्या वेशातील पथके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून पेट्रोलिंग:
अलिबाग रिलायन्स बायपास, पोयनाड ते पेझारी नाका, माणगाव मुख्य बाजारपेठ येथे वाहतूक नियोजनासाठी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे नजर ठेवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याकरिता वापर करण्यात येणार आहे. नववर्षाच्या आनंदावर विरजण पडू नये, याकरिता रायगड पोलिसांनी कंबर कसली असून जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी, अंमलदार बंदोबस्ताकरिता सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.