संपूर्ण राज्यभर विनापरवाना बेकायदेशीर रीतीने लावल्या जाणार्या फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग्स, जाहिराती मुळे ग्रामीण व शहरी भागाला येणारा बकालपणा, विद्रुपीकरण याविरोधात उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिका व जनहित याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत बांधकामे व अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्स, पोस्टर्सवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विरूपण अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार महापालिकांनी सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स, जाहिराती हटवण्याचे निर्देश दिलेले असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेने वर्तमानपत्रातून "जाहीर आवाहन” प्रकाशित करत शहरात विनापरवाना जाहिराती, फ्लेक्स-बॅनर्स, होर्डिंग्स लावणार्या व्यक्ती, पक्षविरोधात कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केलेले होते. पालिकेच्या या निर्देशाला न जुमानता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर संपूर्ण शहरभर विनापरवाना फ्लेक्स-बॅनर्स, होर्डिंग्स झळकलेले दिसत आहेत.
आश्चर्याची बाब ही आहे की वर्तमानपत्रातून कारवाईचे निर्देश देणारे महापालिका प्रशासन मात्र प्रत्यक्षात संपूर्ण शहरभर बेकायदेशीर फ्लेक्स -बॅनर्स -पोस्टरची भाऊगर्दी उघडपणे दिसत असताना त्याकडे सर्र्हासपणे दुर्लक्ष करताना दिसते आहे. पालिकेच्या या बोटचेप्या धोरणामुळे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींना धाक उरलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी उमटताना दिसते आहे . शहरभर झळकणार्या फ्लेक्स बॅनर्सची दखल घेत सजग नागरिक मंच नवी मुंबईच्यावतीने पालिका प्रशासनाला न्यायालयाचा अवमान टाळण्यासाठी तातडीने कारवाई करण्याबाबतची तक्रार वजा निवेदन दिलेले आहे.
पालिका प्रशासनाने आपले सर्व अधिकार हे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या चरणी अर्पण केलेले आहेत की काय? अशी शंका देखीलनिवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे. पालिकेची निष्क्रियता ही उच्च न्यायालयाचा अवमान करणारीठरते. भविष्यात नागरिकांना तक्रार करण्यासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग्स, जाहिराती या अधिकृत आहेत की अनधिकृत हे कळण्यासाठी पालिकेने परवाना दिलेल्या फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग्स, जाहिरातीवर परवाना क्रमांक, स्थळ, संख्या, शुल्क, परवाना कालावधी हे स्पष्ट रीतीने छापणे अनिवार्य करावे, नवी मुंबई शहरात जे मोठमोठे होर्डिंग्स लावलेले आहेत त्यावर देखील परवानगीची परिपूर्ण माहिती देणारे क्यू आर कोड लावणे सक्तीचे असावे, भविष्यात विनापरवाना फ्लेक्स-होर्डिंग्स-बॅनर्स -जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी ज्या प्रभागात विनापरवाना फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग्स-जाहिराती आढळून येतील त्या त्या प्रभाग अधिकार्यांना उत्तरदायी ठरवत नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी, दोषी प्रभाग अधिकार्याच्या सेवा पुस्तिकेत कर्तव्यात कसूर केल्या बद्दलची नोंद करण्यात यावी असे उपाय देखील मंचाच्या वतीने सुचविण्यात आलेले आहेत.
एखाद्या नागरिकाने आपल्या दारासमोर वाळू -सिमेंटच्या ४ गोण्या ठेवल्या तरी पालिका कर्मचारी -अधिकार्यांच्या नजरेतून ही बाब सुटत नाही. लगेचच कर्मचारी साहेबांचा निरोप घेऊन त्या नागरिकाच्या दारावर धडक मारतो. एवढ्या उच्च दर्जाची कार्यक्षमता, कार्यतत्परता, सजगता असणार्या पालिका कर्मचारी -अधिकार्यांना शहरभर दिसणारे फ्लेक्स -होर्डिंग्स दिसत नसतील यावर पालिका शाळेत बालवाडीत जाणारा विद्यार्थी देखील विेशास ठेवणार नाही. - सुधीर दाणी संपर्क क्रमांक ९८६९२२६२७२