माणगांव | ॠतुमानानुसार पीक घेण्याची परंपरा असलेल्या रायगड जिल्ह्यात विविध हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्यातील विविध पिकासाठी रायगड प्रसिद्ध आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात भाताचे पीक, हिवाळ्यात विविध कडधान्य पीक तर हिवाळा- उन्हाळ्यात विविध भाजीपाला व कलिंगड आदी पिके जिल्ह्यात घेतली जातात.
गेले कित्येक वर्षे हे चक्र सुरू आहे. जूनला सुरू झालेला पावसाळा सप्टेंबरअखेर परतीला लागतो व ऑटोबर महिन्यात हिवाळी शेतीची कामे सुरू होतात. यावर्षी मात्र लांबलेल्या पावसाने उघडीप दिली नव्हती, सतत पाऊस पडल्याने शेतकर्यांची कापणी सह सर्वच कामे रखडली होती.
मात्र नोव्हेंबर महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाने कडधान्ये शेती लागवड करण्यात आली आहे. थंडी, योग्य हवामान यामुळे पेरणी झालेली कडधान्ये चांगली उगवून आली असून कडधान्ये शेती बहरत आहे. ऑटोबर महिन्यात कडधान्ये शेतीची लागवड केली जाते. काही शेतकरी भात कापणीपूर्वी वाळ, मटकी इत्यादी कडधान्य शेतात पेरतात.