कोलाड | श्रीवर्धन शहरालगत असलेल्या असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील कुंदन रेसिडेन्सी या इमारतीमध्ये एका वृद्धाची डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी अज्ञात खुनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास गोविंद खैरे (वय ७२) असे मृताचे नाव आहे.
रामदास खैरे हे कुंदन रेसिडेन्सी इमारतीमध्ये रहात होते. त्यांचा कोणताही संपर्क होत नव्हता व रहात असलेल्या प्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर नातेवाईक प्रज्योत शरद जाधव (२७, रा.जांभूळ) यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता रामदास खैरे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले.
त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी तात्काळ श्रीवर्धन पोलिसांना याबाबतची माहिती दिली. रामदास खैरे हे प्रज्योत जाधव यांच्या बहिणीचे सासरे असून, त्यांची हत्या झाल्याची तक्रार दाखल करण्यातआली आहे. याप्रकरणी अज्ञातावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे व पोलीस निरीक्षक उत्तम रीकामे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.