अलिबाग | सात वर्षांच्या मुलीला बोटीवर नेऊन तिच्यावर तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुरुड कोर्लई येथे समोर आली आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरूणाला रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. सात वर्षांची ही अल्पवयीन मुलगी तिच्या बहिण भावासह प्रातःविधीसाठी समुद्रकिनारी गेली होती.
यावेळी हा तरुण तेथे आला, तिला फूस लावून बहिण भावांपासून दूर घेऊन गेला. नंतर तिला किनार्यावर लागलेल्या एका बोटीत नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेचा मुलीला जबर धक्का बसला. शारिरीक वेदनाही जाणवू लागल्या. त्यामुळे पिडीत मुलीने याबाबतची माहिती तिच्या आईला दिली.
आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून यासंदर्भातील तक्रार नोंदवली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आर्यन कोटकर या २२ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एम टी शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.