नवीन गटारे टपरीधारकांसाठी डोकेदुखी , पाण्याचा निचरा होत नसल्याने प्रचंड दुर्गंधी; पर्यटक, स्थानिकांची नाराजी

By Raigad Times    30-Dec-2024
Total Views |
 Murud
 
मुरुड-जंजिरा | मुरुड समुद्रकिनारी नव्याने बांधण्यात आलेल्या गटारे येथील टपरीधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या गटारातील पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नसल्याने, पाणी साचून या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांस पर्यटकांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी, याठिकाणी पर्यटक थांबत नसल्याने, टपरीधारकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
 
मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची संख्या वाढावी व स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा, याकरिता मुरुड समुद्रकिनारा सुशोभीकरणासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी १३.५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. सद्यस्थितीत ही सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु याठिकाणी नव्याने बांधलेली गटारे टपरीधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. गटारातील पाणी योग्य पध्दतीने निचरा होत नसल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.
 
Murud
 
याठिकाणी डासांची पैदास वाढत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रचंड दुर्गंधीमुमळे याधास्तीने पर्यटक याठिकाणी खाण्यासाठी थांबत नसल्यामुळे टपरीधारकांना यांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने याची गांभीर्याने दखल घेऊन, गटारातून पाणी निचरा कसा होईल? याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
 
यासंदर्भात बोलताना टपरीधारक अरविंद गायकर यांनी सांगितले की, काम सुरू करण्यापूर्वी आम्हाला विश्वास न घेता या ठिकाणी गटारे बांधण्यात आली आहे. येथे गटाराची गरज नसताना गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे टपरीधारकांची जागाही कमी झाली. जी गटारे बांधली त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने, याठिकाणी चिखल जमा झाला आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक या ठिकाणी खाण्यासाठी व खरेदीसाठी थांबत नाही.
 
यामुळे सर्वंच टपरीधारकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. यासंदर्भात मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी तातडीने याठिकाणी भेट देऊन पाहणी केली; परंतु त्यावर ठोस निर्णय होत नसल्याने चार दिवसांपूर्वी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने मुख्याधिकारी यांना पुन्हा लेखी निवेदन देण्यात आले आहे.
 
गटारातील चिखल काढुन द्यावा, सुशोभीकरण ठिकाणी सिमेंटची धूळ जमा झाले आहे ती ठेकेदाराकडून पाणी मारुन स्वच्छ करावी जेणेकरून येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांना व स्थानिकांना यांचा त्रास होणार नाही, अशा मागण्या करण्यात आल्या असल्याची माहिती टपरीधारक व पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी दिली.