परतीच्या प्रवासात पर्यटकांचे हाल , अलिबाग बस स्थानकात उसळली तोबा गर्दी

By Raigad Times    30-Dec-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | शनिवार, रविवार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी रायगडमध्ये आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात चांगलेच हाल झाले. अलिबाग एसटी स्थानकांत प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. तिकीट काढण्यासाठी अलिबाग एसटी स्टँडवर मोठी रांग लागली होती. बसची वाट पाहत पर्यटकांना तासन्तास ताटकळत उभे रहावे लागले.
 
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक मागील दोन दिवस अलिबागमध्ये आले होते. अलिबाग, नागाव, किहीम, रेवदंडा अशा किनारयांवर पर्यटकांनी दोन दिवस मनमुराद आनंद लुटला. रविवारी दुपारनंतर ते पुन्हा आपल्या घराकडे जायला निघाले. मात्र एसटी बसेस पुरेशा नसल्याने त्यांना खूपच त्रास सहन करावा लागला. अलिबाग ते पनवेल मार्गावर धावणार्‍या बसेस अपुर्‍या पडत होत्या.
 
एरव्ही या मार्गावर विनावाहक धावणारया बसेस मध्ये उभे राहून प्रवास करण्याची मुभा नाही; मात्र आज प्रवाशांना उभे राहून प्रवास करू दिला जात होता. ज्या बसेस पनवेल मार्गावर धावत होत्या, त्या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला.
 
प्रवाशांना अधिकच्या बसेस उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी सांगितले. दुसरीकडे जलमार्गावरून प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी होती. जलमार्गावरील बुकींग फुल झाल्याने पर्यटकांना एसटी बसचा पर्याय निवडावा लागला. मात्र तेथे तासनतास वाट पाहून वैतागलेल्या प्रवाशांनी अधिकचे पैसे देऊन खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडला.