नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर , इंडिगो पहिल्या व्यावसायिक ३२० विमानाचे यशस्वी लँडिंग

१७ एप्रिलला प्रवासी कार्गो विमान सुरु होणार

By Raigad Times    30-Dec-2024
Total Views |
panvel
 
पनवेल | नवी मुंबई विमानतळावर रविवारी पहिले व्यावसायिक ‘इंडिगो ३२०’ या विमानाचे यशस्वीरित्या लँडिंग झाले. लँड झाल्यावर विमानाला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. यानंतर पनवेलसह नवी मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी मुंबई विमानतळावरुन विमानसेवा आता टप्प्यात आहे. १७ एप्रिल २०२५ मध्ये पहिले प्रवासी विमान सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी इंडिगो एअरलाईनचे व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँडिंग केले गेले. महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते. आता थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात आले. यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रन वे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे जवळपास पूर्ण झाली असल्याचे समजते. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
 
१७ एप्रिल २०२५ मध्ये पहिले प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होईल, अशी माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी.व्ही.जेके शर्मा यांनी दिली आहे यासाठी विमानतळाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसेच, सर्व परवानग्या मार्चपर्यंत मिळतील. १७ एप्रिल रोजी देशांतर्गंत विमानसेवेचे उद्घाटन होईल तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन होण्यास जून उजाडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून ४० किमी अंतरावर असणार्‍या पनवेलजवळ बांधण्यात आले आहे. १ हजार १६० हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आले आहे.नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसेच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचार सुरु असल्याची चर्चा आहे.