म्हसळा येथे पर्यटकांमध्ये वाद; स्थानिकाला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न

By Raigad Times    04-Dec-2024
Total Views |
 mhasla
 
म्हसळा | पर्यटकांच्या दोन गटांत सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या म्हसळा येथील स्थानिकाला पर्यटकांनी दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील पाचजणांना म्हसळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सलीम घंसार हे रविवारी (१ डिसेंबर) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माणगावकडून म्हसळा येथे येत असताना घोणसे घाटात त्यांना दोन गटांत वाद सुरु असल्याचे दिसले.
 
त्यामुळे सलीम हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता पाच मद्यधुंद पुणेकर पर्यटकांनी सलीम यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे दगडाने ठेचण्याचा प्रयत्न या पर्यटकांनी केला. या हल्ल्यानंतर या पर्यटकांनी माणगावच्या दिशेने पळ काढला.
 
सलीम यांच्या चेहर्‍यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी माणगाव पोलिसांनी या पाच जणांना अटक केली आहे. या सर्वांना म्हसळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात मद्यधुंद पर्यटकांची दादागिरी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. हरिहरेश्वर येथील घटना ताजी असताना रविवारी रात्री घोणसे घाटातील हा प्रकार समोर आला.