नवी दिल्ली | कोकण रेल्वेचे भारतील रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्यासाठी देशातील अन्य चार राज्यांनी हक्क सोडणे आवश्यक आहे. मात्र कोकण रेल्वेची सेवा गतिमान करण्याकरिता सात नवीन ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये दोन ‘वंदे भारत’ ट्रेनचा समावेश असणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी दिल्ली येथील सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा अतारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
कोकण रेल्वेचे विलिनीकरण, दुरुस्ती, प्लॅटफॉर्म विस्तारीकरण, उपमार्ग, लोकांचे असलेले पर्यायी मार्ग याबाबत देखील त्यांनी लक्ष वेधून घेतले होते. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तर दिले. कोकण रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये भांडवली खर्चासाठी भारत सरकार रेल्वे विभाग, महाराष्ट्र शासन, कर्नाटक राज्य शासन, केरळ राज्य शासन व गोवा राज्य शासन यांनी भांडवली गुंतवणूक केलेली आहे.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण या चार राज्यांच्या हक्क सोडण्याच्या अटीवरच अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोकण रेल्वेचीे सेवा प्रवाशांकरीता अधिकाधिक गतिमान करण्याकरीता रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, रोहा-वीर सेक्शनचे दुपदरीकरण, अतिरीक्त थांबे, अशा पध्दतीच्या योजना राबविल्या असून, भविष्यामध्येही त्या राबविण्यात येतील तसेच सात नवीन ट्रेन त्यामध्ये दोन ‘वंदे भारत’ ट्रेन जोडण्याकरिता दिल्या आहेत.
प्रवाशांच्या व स्थानिक नागरिकांच्या सोयीकरीता ओव्हरब्रिज, सब वे, पाथ वे, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म रुंदीकरण अशा सोयी उपलब्ध करून देण्यात येतील, रेल्वेमंत्री यांनी म्हटले आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कोकण रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला.