सापडलेला मोबाईल पोलिसांनी मूळ मालकाला केला परत , विशाल कांबळे याच्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक

By Raigad Times    04-Dec-2024
Total Views |
 nagothane
 
नागोठणे | नागोठण्यातील शांतीनगर भागातील रहिवासी, नागोठणेतील हायवेनाका येथील ‘हॉटेल विशाल’चे मालक विलास कांबळे यांचा मुलगा तसेच माणगाव येथील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेचे कर्मचारी विशाल विलास कांबळे यांना सापडलेला अ‍ॅपल कंपनीचा महागडा आयफोन त्यांनी नागोठणे पोलिसांकडे रविवारी (१ डिसेंबर) सकाळी सुपूर्द केला आहे.
 
त्यानंतर नागोठणे पोलिसांनी या आयफोन मोबाईलचा मालक सागर हिंदुराव कणसे, रा. मोरया होम टाऊन, चिकणी- नागोठणे यांना रविवारी सायंकाळी तो परत केला. त्यामुळे विशाल कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शनिवारी (३० नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विशाल कांबळे हे शांतीनगर भागातील त्यांचे शेजारी मिलिंद जांबेकर यांच्या जनरल स्टोअरमध्ये उभे होते. त्याचवेळी नागोठणेत येण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर व जांबेकरयांच्या दुकानासमोर एक मोबाईल फोन पडलेला विशाल कांबळे यांना दिसून आला.
 
त्यानंतर ते फोन उचलल्यास गेले असता फोनवरून वाहने गेल्याने मोबाईल फोनचे काहीसे नुकसान झाले होते. मात्र हा अ‍ॅपल कंपनीचा महागडा आयफोन असल्याने तो चालू स्थितीत होता. विशाल कांबळे यांनी सदर मोबाईलवर कुणाचा फोन येत आहे का? याची खूप वेळ वाट पाहिली.
 
मात्र सकाळपर्यंत कोणाचाही फोन या मोबाईलवर आला नाही. त्यानंतर विशाल कांबळे यांनी नागोठण्यातील पत्रकार महेश पवार यांना नागोठणे पोलीस ठाण्यात सोबत नेऊन सापडलेलाहा मोबाईल फोन नागोठणे पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल ब्रिजेश भायदे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, या मोबाईल फोनवर मूळ मालक सागर कणसे यांचा फोन आल्यानंतर ब्रिजेश भायदे यांनी कणसे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व मोबाईल फोनची ओळख पटवून तो फोन कणसे यांच्या ताब्यात दिला. मोबाईल मालकानेही विशाल कांबळे यांचे आभार मानले.