महाड एमआयडीसीतील अ‍ॅस्टेक कंपनीत लागलेल्या आगीचा अहवाल नाहीच , प्रांताधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

By Raigad Times    04-Dec-2024
Total Views |
 mhad
 
महाड | महाड औद्योगिक वसाहतीमधील अ‍ॅस्टेक लाईफ सायन्सेस केमिकल लि. या कंपनीला लागलेल्या आगीबाबतचा अहवाल सातमहिन्यांनंतरही देण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महाडचे प्रांताधिकारी यांनी दिले आहेत. १० एप्रिल २०२४ रोजी रात्री या कंपनीत भीषण आग लागली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
मात्र या आगीमागील कारण काय? याचा अहवाल अजूनही आलेला नाही. याबाबत महाड एमआयडीसी पोलिसांकडून वारंवार स्मरणपत्र देऊनही हा अहवाल देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला होता. त्यामुळे या आगीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. याबाबतत्र प्रांताधिकारी महाड यांनी घेऊन उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य रायगड, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण मंडळ महाड यांना पत्र पाठवून तातडीने या आगीची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले आहेत .
 
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल झोन असल्याने बर्‍याचशा कंपन्यांमध्ये घातक केमिकलचा वापर करून उत्पादन घेतले जात असते. अशा कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असतात. मात्र मागील एक दोन वर्षात घातक रसायनांचा वापर व साठा करून ठेवलेल्या कंपन्यांमध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.गतवर्षी ब्लु जेट कंपनीत लागलेली भीषण आग हे याचे ताजे उदाहरण आहे.
 
या आगीत ११ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या आगीची कारणमिमांसा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या दुर्घटनेला एक वर्ष होऊन गेला तरीही हा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.अशाच प्रकारची आग ११ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्री १ वा .चे दरम्यान अ‍ॅस्टेक लाईफ सायन्सेस कंपनी मध्ये लागली होती.
 
कंपनीतील डि. डि.ए.प्लॅटमधील एस.सी. एल स्क्रबर टँकचे तापमान वाढून त्यामधून धूर येत होता व सदर टँकचे तापमान कमी करण्याचे काम फायर ब्रिगेडच्या सहाय्याने पाणी व फोम मारून कमी केले जात होते परंतु १.४५ वा. चे सुमारास अचानक एस.सी.एल. स्क्रबर साठविण्याची टाकी ही प्लास्टीकची असल्याने त्या टाकीने अचानक बाहेरून पेट घेतला त्यामुळे कंपनीचे डि.डि.ए. प्लँटचे स्क्रबर एरिया मधील टाक्या ब्लोअर, केमिकल सप्लाय करण्याचे पाईप लाईन तसेच इतर साहित्य हे जळून कंपनीचे सुमारे २० लाखाचे नुकसान झाले.
 
या घटनेनंतर या आगी मागील कारण मिमांसा कळावी यासाठी महाड एमआयडीसी पोलिसां कडून फॅक्टरी इन्स्पेक्टर यांना अ‍ॅस्टेक लाईफ सायन्सेस कंपनीचे घटना घडले ठिकाणची पाहणी करून सदरची घटना कशामुळे झाली असून कोणाचा हलगर्जीपणा झाला आहे काय तसेच सदरची घटना कशामुळे झाली याबाबत आपला स्पष्ट अभिप्राय मागवण्यात आला होता. मात्र या घटनेला ७ महिने होऊन गेले तरीही हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही.
 
यासाठी पोलिस प्रशासना कडून संबंधित फॅक्टरी इन्स्पेक्टर यांना तीन ते चार स्मरण पत्र पाठवण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांनी दिली. अ‍ॅस्टेक कंपनीच्या आजुबाजुस अन्य कंपन्या व मानवी वस्ती असून या आगीचा भडका उडून त्याची झळ शेजारील कंपन्या व गावांना बसली असती तर महाडचा भोपाळ होण्यास वेळ लागली नसती. महाड औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढले असून या आगीचे प्रमाण रोखण्याचे काम कंपनीची नियमित तपासणी करण्याचे काम करणार्‍या फॅक्टरी इन्स्पेक्टर यांची आहे.
 
फॅक्टरी इन्स्पेक्टर जर आगींना जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांना पाठीशी घालत असतील तर ते महाड औद्योगिक वसाहती मधील कंपन्या, त्यात काम करणारे लाखो कामगार आणि आजुबाजुला राहणारे नागरिक यांच्यासाठी धोकादायक असून आपल्या कर्तव्यात कसूर करणार्‍या फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि त्यांच्याशी साटेलोटे करणारे कंपनीचे अधिकार यांच्यावर कडक कारवाई करण्याची व महाडचे प्रांताधिकारी यांनी या प्रकरणी जातीने लक्ष देण्याची मागणी केली जात असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याची दखल घेत प्रांताधिकारी डॉ. बाणापुरे यांनी या आगीची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले आहेत.