अलिबाग | अलिबाग समुद्रकिनार्यावर बियरची बाटली पोटात भोसकून तरुणाची हत्या करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघेही आक्षी साखर येथील राहणारे आहेत. हत्येनंतर ते पसार झाले होते. अलिबाग समुद्रकिनारी शनिवारी (३० नोव्हेंबर) रात्री किरकोळ कारणावरुन मितेश जनार्दन पाटील या तरुणाची हत्या करण्यात आली.
पेण तालुक्यातील गडब चिरबी येथील राहणारा मितेश आणि त्याचा मित्र प्रथमेश पाटील हे दोघे शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्र किनारी बियर पीत बसले होते. बियर पीत असताना मितेशच्या हातातील बियरची बाटली खाली पडून फुटली. त्याचा आवाज झाला. यावेळी तिथे शेजारी दारू पिण्यासाठी बसलेल्या अन्य पाचजणांनी या दोघांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. मितेश आणि त्याचा मित्र प्रथमेश यांने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र यावेळी एकाने मितेश याच्या पोटावर आणि खांद्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात मितेश गंभीररित्या जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा गुन्हा अलिबाग पोलिसात दाखल करण्यात आला. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी यांची तात्काळ वेगवेगळी पथके तयार केली.
या पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून राज रमन जयगडकर, प्रथमेश शेखर घोडेकर आणि प्रमोद किसन साठविलकर (तिघेही रा. साखर पो. आक्षी, ता. अलिबाग) यांना अटक केली. चौकशीत या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत. दरम्यान, पोलीस हवालदार सचिन शेलार, अक्षय पाटील, अक्षय जाधव, रुपेश निगडे, इश्वर लांबोटे यांनी ही कामगिरी पार पाडली.