प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेने केली वृध्दाची हत्या, महिलेसह तिचा पती अटकेत, रायगड गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

श्रीवर्धन हत्या प्रकरणाचा खुलासा

By Raigad Times    05-Dec-2024
Total Views |
shreewardhan
 
श्रीवर्धन | लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेने रामदास खैरे यांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेसह तिच्या पतीला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. रामदास गोविंद खैरे (वय ७२) हे श्रीवर्धन येथील कुंदन रेसिडन्सी याठिकाणी राहत होते. त्यांची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. दुसरी पत्नी २०२१ साली कोविडमध्ये मयत झाली. मुलाचे लग्न झाल्यामुळे निवृत्ती काळात ते एकटेच श्रीवर्धन येथे राहत होते.
 
दरम्यानच्या काळात खैरे यांनी एका मित्रामार्फत कविता नावाच्या महिलेशी विवाह करण्याचे ठरविले. मात्र या महिलेने मुंबईत फ्लॅट व दागिने मागितल्यामुळे हे लग्न फिस्कटले होते. काही दिवसांनी कविताने अर्चना नावाच्या मैत्रिणीला खैरे यांचा मोबाईल नंबर दिला व त्यांना संपर्क साधण्यास सांगितले. अर्चनाने खैरे यांना फोन केला. यानंतर रामदाससोबत तिने मैत्रीचे संबंध निर्माण केले. अर्चनाची नजर खैरे यांच्या प्रॉपर्टीवर होती. त्यामुळे विवाह करण्याची तयारी दाखवून ती रामदास यांच्यासोबत राहु लागली.
 
तिने रामदास यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र काही दिवसांनी ती दागिने व काही पैसे घेऊन पसार झाली. अर्चना पसार झाल्याने रामदास खैरे यांनी पैसे व दागिने परत मागण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिने जून २०२४ मध्ये हर्षल कचर अंकुश याच्याबरोबर विवाह केला. यानंतर तिने खैरे आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगत दोघांनी खैरे यांच्या हत्येचा कट रचला. त्यामुळे ११ नोव्हेंबर २०२४ पासून अर्चना पुन्हा एकदा रामदासकडे राहण्यास आली. ही बाई घात करणार आहे, याची जरादेखील भनक खैरे यांना लागली नाही. तिचा नवरादेखील १८ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान हॉटेलवरजाऊन थांबला.
 
खैरे रात्री जास्त झोपत नसल्यामुळे अर्चनाला तिच्या पतीला घरात घेता येत नव्हते. त्यामुळे या दोघांनी रामदास यांना गुंगीचे किटकनाशक देऊन झोपविण्याचा व नंतर.रामदास यांना ठार मारण्याचा प्लॅन केला. त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी रात्री अर्चनाने रामदास यांना जेवणामधून किटकनाशकदिले.
 
त्यादिवशी अर्चनाचा पती हर्षल हा हॉटेलमध्ये येऊन थांबला होता. रामदास झोपी गेल्यानंतर अर्चनाने हर्षलला घरात घेतले.या दोघांनी रामदासच्या प्रथम डोक्यावर, कपाळावरतीक्ष्ण हत्याराने मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर पूर्ण मेल्याची खात्री होईपर्यंत उशीने तोंड व नाक दाबले. नंतर घराची साफसफाई करुन रामदासचा मोबाईल, दागिने काही पैसे घेऊन, घर बाहेरुन बंद करुन हे दोघेही पहाटेच पसार झाले.