अलिबाग | विद्यासान एज्युकेशनल फाऊंडेशन अलिबाग आणि इन्स्टीट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ जानेवारीला ‘वेध अलिबाग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरसीएफ सभागृहात होणार्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या पाच प्रतिभावंतांना जाणून घेण्याची संधी अलिबागकरांना मिळणार असल्याचं कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर राजीव धामणकर यांनी दिली.
यावेळी विद्यासन एज्युकेशनल फाऊंडेशनच्या डॉ. रिटा धामणकर, विद्या पाटील, महेश चव्हाण, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, प्राची देशमुख आणि आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील उपस्थित होते. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर चिन्मय गवाणकर, लेखक अरविंद जगताप, जगभ्रमंती करणार्या एकल प्रवासी आभा चौबळ, आणि डिझाईन जत्रा या सामाजिक स्थापत्य संस्थचे विनिता कौर एम चिरागिया, प्रतिक धनमेर आणि शार्दुल पाटील या तिघांचा समावेश असणार आहे. मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी त्यांच्या मुलाखती घेणार आहेत.
गेल्या वर्षी वेध मार्फत अंधत्वावर मात करत संशोधन कार्य करणार्या आणि वेगवेगळ्या वस्तूंचे पेटंट मिळवणार्या सागर पाटील, टाकाऊ प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करणार्या आणि पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या अमिता देशपांडे, भारताचा लेक मॅन अशी ओळख असलेले आनंद मिलिंगवाड, हॉलीवुड चित्रपटांसाठी सेट उभारणारे, कला दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे दिलीप मोरे, आणि कोकणचा रान माणूस म्हणून प्रसिद्ध असलेला प्रसाद गावडे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास अलिबागकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.
त्यामुळे पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अलिबागकरांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यानिमित्ताने डॉक्टर धामणकर यांनी केले आहे. विद्या पाटील आणि डॉ. धामणकर यांनी संस्थेच्या विवीध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. महेश चव्हाण आणि संतोष वझे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. आयुष्यचीदिशा ठरविण्यासाठी प्रेरणा देणार्या, मार्गदर्शन करणार्या या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सामील होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग तर्फे करण्यात आले. कार्यक्रमातील सहभागासाठी : ८६९८७९५७९६ (उमेश वाळंज) किंवा ९८५०९६५४५२ (अनिल आगाशे) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.